जय श्रीराम व जय झुलेलालचा गजराने दुमदुमले शहर

0
12

गोंदिया : विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या हिंदू नववर्षानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेने आणि सिंधी समाजाचे आद्य दैवत साई झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेने शनिवारी गोंदिया शहर दुमदुमून गेले. जय श्रीराम आणि जय झुलेलालचा गजर करीत या शोभायात्रेने गोंदियावासीयांचे लक्ष वेधून घेतले.
येथील सिव्हील लाईन्स, हनुमान चौकातून प्रभू रामचंद्रांची तर सिंधी कॉलनीतून साई झुलेलाल यांची शोभायात्रा निघाली होती. मराठी नववर्षाला शनिवारपासून (दि.२१) प्रारंभ झाला. चैत्र नवरात्रोत्सवालाही सुरूवात झाली. गुढीपाडवा ते रामनवमी या काळासाठी गोंदियात श्रीरामाच्या मूर्तीची वाजतगाजत येऊन स्थापना केली जाते. शहरातील नेहरू चौकात प्रभू रामचंद्रांच्या मुर्तीची स्थापना करून नऊ दिवस पूजा-अर्चना केली जाते. त्यासाठी बजरंग दल व विश्‍व हिंदू परिषदेच्यावतीने दरवर्षी शहरात शोभायात्रा काढली जाते.
यंदाही येथील सिव्हील लाईन्स हनुमान चौकातून प्रभू रामचंद्रांची शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने निघालेल्या या शोभायात्रेत मोठय़ा संख्येत बजरंग दल व विश्‍व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सिंधी समाजाचे आद्य दैवत साई झुलेलाल यांचा जयंती दिवस व नववर्ष असल्याने सिंधी समाजाचीही शहरात शोभायात्रा निघाली होती. हजारोंच्या संख्येत सिंधी बांधव त्यात सहभागी झाले होते. या शोभायात्रेतील आकर्षक देखाव्यांनी मन मोहून घेतले. सिंधी कॉलनीतून ढोलताशांच्या गजरात नाचत गात निघालेली ही शोभायात्रा मुख्य मार्गाने फिरली.