गाव विकासात महिलांचे योगदान महत्त्वाचे – आ. रहांगडाले.

0
31

गोरेगाव,दि.22ः- महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांपेक्षा सरस असतात. कुटुंब चालविण्या पासून तर मुलांचे शिक्षण यात त्यांची भूमिका महत्त्वाची असते. आता तर गाव विकासात महिलांचे योगदान अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन तिरोडा – गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांनी केले. एकात्मिक बालविकास प्रकल्प गोरेगाव व ग्रामपंचायत सटवा यांच्या पुढाकाराने व जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग यांच्या सहकार्याने गोरेगाव तालुक्यातील सटवा येथे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात 21 फेब्रुवारी रोजी महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुण मार्गदर्शन करताना बोलत होते.

उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य रोहिणी वरखडे तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती माधुरी टेंभरे, गोंदिया जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे, पंचायत समिती सदस्य पुष्पराज जणबंधू,एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी राजेश वाघ, विस्तार अधिकारी गिर्‍हेपुंजे, सरपंच विनोद पारधी, भागचंद्र रहांगडाले, माजी सरपंच रमेश ठाकूर, पोलीस पाटील टिकाराम रहांगडाले, डॉ. के. टी. कटरे, लिखण पारधी, अंगणवाडी पर्यवेक्षका श्रीवास्तव, केंद्रप्रमुख निशा वैकुंठी, उपसरपंच ओमप्रकाश चौधरी, उमराव कडूकार, मुख्याध्यापक बिजेवार, सरिता बेदरकर, रजनी रामटेके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रशेखर भगत यांच्यासह परिसरातील सरपंच उपस्थित होते.

एकात्मिक बालविकास प्रकल्प गोरेगाव च्या वतीने कवलेवाडा बीट च्या वतीने अंगणवाडी सेविका यांनी विविध प्रदर्शनीचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित महिलांना महिला सक्षमीकरण, मासिक पाळी व्यवस्थापन, अंधश्रद्धा निर्मूलन, बेटी बचाओ आदी विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले. गाव शाश्वत होण्याच्या दृष्टीने गावांत प्लास्टिक बंदी करावी यासाठी पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद गोंदिया यांच्या वतीने उपस्थित सर्व महिलांना कापडी पिशव्या वितरित करण्यात आल्या. कवलेवाडा बीट अंतर्गत येणार्‍या सर्व अंगणवाडीच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अंगणवाडी सेविका बोपचे यांनी तर आभार सरपंच पारधी यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती, कवलेवाडा बीट अंतर्गत येणार्‍या सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी सहकार्य केले.