जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींचा,सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

0
28

·         ६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी पोटनिवडणूक

·         २४ मार्च रोजी होणार मतदान

वाशिम, दि. २२ : राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ३२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम तसेच ६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सार्वत्रिक व पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यत अस्तित्वात राहणार आहे. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री,खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहिता कालावधीत कुठे करता येणार नाही, असे राज्य निवडणूक आयोगाने सूचित केले आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार सार्वत्रिक निवडणूक व पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र ५ ते ९ मार्च २०१९ या कालावधीत सकाळी ११ वाजतापासून ते दुपारी ३ वाजेदरम्यान स्वीकारले जाणार आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी ११ मार्च २०१९ रोजी सकाळी ११ वाजतापासून सुरु होईल. १३ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. त्याचदिवशी दुपारी ३ वा. नंतर निवडणूक चिन्हांचे वाटप होईल व अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. आवश्यकता असल्यास २४ मार्च २०१९ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वा. पर्यंत मतदान घेण्यात येईल. मतमोजणी २५ मार्च २०१९ रोजी होईल व २८ मार्च २०१९ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

सार्वत्रिक निवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायती

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार वाशिम तालुक्यातील एकांबा, अडगाव खु., देवठाणा बु., जांभरुण नावजी, वांगी, सोयता, रिसोड तालुक्यातील भरजहांगीर, मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे, खडकी इजारा, कुत्तरडोह, मुसळवाडी, अमाना, मंगरूळपीर तालुक्यातील मंगळसा, लाठी, चिखली, तपोवन, बिटोडा,इचोरी, मानोरा तालुक्यातील बोरव्हा, चौसाळा, दापुरा बु. दापुरा खु., ढोणी, फुलउमरी, गिरोली, जामदरा घोटी, काली, कोलार, पाळोदी, सोमेश्वरनगर, उमरी बु., उमरी खु. या ३२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे.

थेट सरपंच निवडीसाठी पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती

जिल्ह्यातील ६ ग्रामपंचातींच्या सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील गोंडेगाव,रिसोड तालुक्यातील घोन्सर, मोरगव्हाण, मंगरूळपीर तालुक्यातील वसंतवाडी, मानोरा तालुक्यातील खांबाळा, कारंजा तालुक्यातील झोडगा बु. या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.