सर्वांसाठी घरे योजनेचा बांधकाम कामगारांना लाभ दया- पालकमंत्री

0
24

भंडारा,दि.22 :- भंडारा जिल्हयातील बांधकाम क्षेत्रातील कामगारांना सर्वांसाठी घरे 2022 या योजनेचा लाभ देण्यासाठी नियोजन करण्यात येणार असून महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या 29 योजनांचा लाभ शेवटच्या माणसाला दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. भंडारा शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 58 कोटी रुपयाची तरतूद शासनाने केली असून पुढील दीडवर्षात भंडारावासियांना पिण्याचे शुध्द पाणी 24 तास मिळेल, असे त्यांनी या प्रसंगी सांगितले.
‘सन्मान कष्टाचा, आनंद उद्याचा’ लाभ वाटप सोहळा, भंडारा शहर पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व महिला व ज्येष्ठ नागरिक आरोग्य निदान शिबीराच्या कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. आमदार डॉ. परिणय फुके, चरण वाघमारे, बाळा काशिवार, कामगार मंडळाचे ओमप्रकाश यादव, म्हाडाचे सभापती तारिक कुरेशी, जिल्हाधिाकरी शांतनू गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, प्रदीप पडोळे, कामगार मंडळाचे सचिव श्री.चु. श्रीरंगम, उपाध्यक्ष आशु गोंडाणे, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे व नगरपालिकेचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा शहर पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केले. त्यानंतर लाभ वाटप सोहळयाचे दीप प्रज्वलन करुन उदघाटन केले. यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी शासनाने सर्वात चांगली योजना आणली आहे. या योजनेत कामगारांचा सर्वांगिण विकास करण्याची तरतूद आहे. जिल्हयात 30 हजाराचेवर कामगारांची नोंदणी झाली असून यामधून एकही कामगार सुटू नये यासाठी विशेष कँप लावून नोंदणी केली जाईल.
भंडारा शहराला गेल्या अनेक वर्षापासून दुषित पाणी पुरवठा होत होता. मुख्यमंत्री यांनी 58 कोटींची योजना मंजूर केली आहे. या योजनेचे आज भूमिपूजन झाले असून दीडवर्षात योजना पूर्ण होवून भंडारा वासियांना पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध होणार आहे. यासोबतच 15 हजार घरांमध्ये नळ जोडण्या दिल्या जाणार आहेत. सर्वांसाठी घरे 2022 व पट्टे वाटप या योजनांचा लाभ जिल्हयात मोठया प्रमाणात दिला जात आहे. असे पालकमंत्री म्हणाले. पेंचच्या लाभ क्षेत्रात असलेल्या शेतकऱ्यांना विंधन विहिरीचा लाभ देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव, आमदार डॉ. परिणय फुके, चरण वाघमारे, सुनिल मेंढे व श्रीरंगम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश व किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास बांधकाम क्षेत्रातील कामगार तसेच भंडारा शहरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.