तिरोडा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांना ऊत

0
25

तिरोडा,दि.14ःः गेल्या काही महिन्यापुर्वी स्थानिक पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना हटविण्यात आल्यानंतर ठाण्याचा प्रभार सहायक पोलीस निरीक्षकांच्या खांद्यावर सोपविण्यात आला.पु्र्णवेळ पोलीस निरिक्षक नसल्याने गुन्हेगार प्रवृत्तींना वाव मिळत आहे. गुन्ह्यामध्ये वाढ होत असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात प्रभारी ठाणेदाराकडून गुन्हेगारप्रवृत्तींच्या लोकांचे मुसके आवरण्यासाठी कसलेही पाऊल उचलण्यात येत नसल्याने तिरोडा तालुक्यात पोलीसांची भूमिका काय? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
तिरोडा पोलीस ठाणेहद्दीत गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारप्रवृत्तींच्या लोकांचा निर्भीड वावर सुरू झाला आहे. अवैध दारूविक्रीला ऊत आले आहे. परिणामी गुन्ह्यांमध्ये दुप्पटीने वाढ होत आहे; परंतु पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद होत नसल्याचेही समोर आले आहे.अवैध रेती वाहतूक, जुगार, अवैध दारूविक्री यासह अनेक गैरकृत्य करणारे सरसावले आहेत. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील शांतता भंग होत आहे.पोलीसांच्यावतीने अवैध व्यावसायिकांवर करण्यात येत असली तरी हा प्रकार थांबलेला नाही. तर काही व्यवसायिकांशी पोलीस कर्मचार्यांचे साटेलोटे असल्याचीही चर्चा आहे.त्यामुळे तिरोडा शहरासह ग्रामीण भागातील शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पूर्णवेळ अधिकारी द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.