सिनेट बैठकीमध्ये प्रसारमाध्यम प्रवेशबंदीचा प्रयत्न फसला

0
30

नागपूर ,दि.14ःःविद्यापीठ हा शैक्षणिक दहशतवाद्यांचा अड्डा झाला आहे, असे वादग्रस्त विधान करीत कुलगुरू डॉ. सि.प. काणे यांनी आधीच समाजभावनांना ठेच पोहचविली आहे. त्यात बुधवारी झालेल्या सिनेट बैठकीमध्ये प्रसार माध्यमांवर प्रवेशबंदी लादत त्यांनी एकाधिकारशाहीचा कळसच गाठला. त्या विरोधात बुधवारी सिनेट सदस्यांनी तीव्र निषेध करीत कुलगुरूंवर हल्ला चढवला. प्रसार माध्यमांचा आवाज दाबणारे कुलगुरूच खरे दहशतवादी आहेत, असा पवित्रा घेत माध्यमांना प्रवेश द्यावा व दहशतवाद शब्दावरून माफी मागावी, अशी आग्रही मागणी लावून धरली. शेवटी कुलगुरूंनी विशेषाधिकाराचा वापर करीत प्रसारमाध्यमांना प्रवेश दिला. यामुळे बुधवारची सिनेट चांगलीच वादग्रस्त ठरली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात बुधवारी अर्थसंकल्पीय सिनेट बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कुलगुरूंच्या एकाधिकारशाहीविरोधात सदस्यांमध्ये खदखद होती. त्यात कुलगुरूंनी शैक्षणिक दहशतवादाचे वक्तव्य करीत आणखी विरोध ओढवून घेतला. त्यात सिनेटसारख्या बैठकीमध्ये प्रसार माध्यमांवर बंदीही लादली. त्यामुळे बैठकीच्या सुरुवातीलाच सिनेट सदस्य विष्णू चांगदे, ज्येष्ठ सदस्य डॉ. बबनराव तायवाडे, अँड. मनमोहन वाजपेयी यांनी कुलगुरूंना या दोन विषयांवरून घेरले. विद्यापीठाचा जर पारदश्री व्यवहार असेल तर प्रसार माध्यमांवर बंदी का?, माध्यमांना आधी प्रवेश द्या आणि विद्यापीठात दहशतवादी कोण? या दोन प्रश्नांची उत्तर दिल्याशिवाय सभा चालूच देणार नाही असा पवित्रा घेतला. यावेळी यंग टीचर्स असोसिएशन आणि सेक्युलर पॅनलच्या सदस्यांनी सभात्याग करीत कुलगुरूंचा निषेध केला. शेवटी तब्बल तीन तास घमासान वादावादीनंतर कुलगुरूंनी अध्र्यातासासाठी सभा तहकूब करीत माध्यमांना प्रवेश देण्याचे मान्य केले. त्यानंतर सभागृहाच्या नियमित कामकाजाला सुरुवात करण्यात आली. मात्र, या संपूर्ण गोंधळामुळे सभागृहाचे तीन तास नाहक वाया गेले असून विद्यापीठासारख्या ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणार्‍या संस्थेच्या इतिहासात हा काळा दिवस ठरला, असे मत काही सदस्यांनी व्यक्त केले.