सर्व नोडल अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करावे-हृषीकेश मोडक

0
23
  • नोडल अधिकारी यांची आढावा बैठक

वाशिम, दि. १६ :  लोकसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व नोडल अधिकारी यांनी समन्वयाने व नियोजनबद्ध काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिल्या. निवडणूक विषयक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, महसूलचे उपजिल्हाधिकारी आर. डी. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी व्यंकट जोशी, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हा खनिकर्म अधिकारी विनय राठोड, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, अधीक्षक शीतल वाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्व संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्व संबंधित विभागांनी कार्यवाही करून त्याबाबतचे अहवाल वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावेत. आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकांनी दक्ष राहून काम करावे. निवडणूक विषयक बाबींमध्ये कोणत्याही शासकीय विभागाकडून हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता संबधित विभाग प्रमुखांनी घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी यावेळी निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट, वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था, स्वीप कार्यक्रम, एमसीएमसी समिती, जिल्हा संपर्क कक्ष आणि मतदान केंद्रांवर पुरविण्यात येणाऱ्या सुविधांविषयक सद्यस्थितीचा आढावा घेवून आवश्यक त्या सूचना दिल्या.