लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदान करण्यासाठी मिळणार सुट्टी

0
14

गोंदिया दि.२२ : भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. जगातील सर्वात मोठी आदर्श लोकशाही म्हणून भारताकडे बघितले जाते. येत्या ११ एप्रिल रोजी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ तसेच गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व मतदारांना या निवडणूकीत शंभर टक्के मतदान करणे अपेक्षीत आहे. मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणूकांमध्ये संस्था/आस्थापना इत्यादी पगारदारांना भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित राहावे लागले आहे, हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदार असलेल्या कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना मग ते कामानिमीत्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणूकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी देण्यात यावी. ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासाची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पुर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना किमान २ ते ३ तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. मतदारांकडून मतदानाकरीता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास आस्थापना मालकाविरुध्द योग्य ती कारवाई करण्यात येईल.