तीन दिवस आधी हेलिकॉप्टर उतरविण्याची घ्यावी लागणार परवानगी

0
15

गोंदिया दि.२२ :: येत्या ११ एप्रिल रोजी होणाऱ्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ तसेच गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ अनेक राजकीय पक्षांचे नेते व त्यांचे स्टार प्रचारक जिल्ह्यात येणार आहे. जे नेते व स्टार प्रचारक हेलिकॉप्टरने जिल्ह्यात येणार आहे त्यांच्यासाठी हेलिकॉप्टर उतरविणे व हेलिपॅडची परवानगी देण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक यांच्यावर सोपविली आहे. निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहिता मार्च २०१९ निर्देशिकेतील तरतूदीनुसार कमीत कमी तीन दिवस आधी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह परवानगीसाठी संबंधित राजकीय पक्षांनी अर्ज करणे आवश्यक आहे.
ज्यामध्ये हेलिकॉप्टर प्रवासाचे नियोजन, हेलिकॉप्टर क्रमांक, हेलिकॉप्टर उतरविण्याचे स्थान, हेलिकॉप्टरमध्ये नेण्यात येणाऱ्या साहित्याचा तपशिल, हेलिपॅडपासून कार्यक्रमाचे अंतर, त्यादरम्यानची सुरक्षा व्यवस्था व हेलिकॉप्टरनी प्रवास करीत असलेले सर्व प्रवाशांची संख्या व त्यांची यादी, हेलिकॉप्टर उतरविण्याचा व उड्डानाचा दिनांक व वेळ, जागेचा सातबारा, जागेची लांबी-रुंदी, दर्शक नकाशा, जमीन मालकाची संमती, मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र इत्याची माहिती देणे आवश्यक राहील. तसेच याबाबत पोलीस अधीक्षक व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडील ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. तसेच मतदानाच्या व मतमोजणीच्या दिवशी निवडणूक कामाचे नियंत्रण व निरीक्षण यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करता येणार नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक यांनी कळविले आहे.