वाचन संस्कृतीमुळे बौद्धीक विकासाला चालना – डॉ. रवी धकाते

0
22

गोंदिया : इंटरनेटच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत आहे. मात्र पुस्तके व ग्रंथाचे महत्त्व आजही कायम आहे. वाचन संस्कृतीमुळे बौद्धीक विकासाला चालना मिळते, असे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा शासकीय ग्रंथालय आणि श्री. शारदा वाचनालय यांच्या संयुक्त वतीने श्री. शारदा वाचनालयाच्या बजाज सांस्कृतिक सभागृहात गोंदिया ग्रंथोत्सव-2015 चा समारोप 25 मार्च रोजी करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन डॉ. धकाते बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अग्रणी प्रबंधक विवेक लखोटे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीष कळमकर, अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष दुलीचंद बुद्धे यांची उपस्थिती होती.
डॉ. धकाते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत खडतर परिस्थितीतून शिक्षण घेतले. ते ज्ञानयोगी असल्यामुळे सर्वांचे प्रेरणास्थान आहे. वाचनामुळे माणूस सुसंस्कृत होतो. शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिक शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्यास विकासाला चालना मिळेल.
श्री. लखोटे म्हणाले, सध्याचा काळ हा मोबाईल, इंटरनेटचा आहे. त्यामुळे लोक वाचनापासून दूर जात आहे. पुर्वी वाचनालयातून वाचनाची आवड पुर्ण करण्यात येत होती. परंतू वाचनाची आवड असणारा व्यक्ती हा एकटा कधीच नसतो. ग्रंथ व पुस्तके त्याचे मित्र असतात.
डॉ. कळमकर म्हणाले, ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून निश्चितच चांगली माहिती मिळाली आहे. इंटरनेटवर सर्व बाबी उपलब्ध होत असल्या तरी पुस्तकांचे व ग्रंथांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जुन्या संदर्भासाठी पुस्तकांची आजही आवश्यकता पडते. श्री. काळे म्हणाले, ग्रंथालयातील पुस्तकांचा लाभ घेऊन ज्ञानात भर पडते. इंटरनेटवर असलेली माहिती ही पुस्तक आणि ग्रंथावरुनच घेतली आहे. ही इंटरनेटची माहिती देखील अपुर्ण आहे. पुढील आयुष्य चांगले जावे यासाठी ग्रंथालये उपयुक्त आहे. वाचनातून माणूस घडत असतो, त्यामुळे ग्रंथोत्सव अत्यंत उपयुक्त आहे. यावेळी श्री. बुद्धे यांनीही विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, संचालन माहिती सहायक पल्लवी धारव आणि आभार प्रदर्शन ग्रंथपाल शिव शर्मा यांनी केले.