निवडणूक प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी दक्ष रहा – निवडणूक निरीक्षक सुधीरकुमार शर्मा

0
45
????????????????????????????????????
वाशिम, दि. २७ : लोकसभा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेतील प्रत्येक घटकाने दक्ष राहण्याच्या सूचना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक सुधीरकुमार शर्मा यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित सर्व  नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, महसूलचे उपजिल्हाधिकारी आर. डी. काळे, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक श्री. काकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी व्यंकट जोशी, जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अंतर्गत लेखा परीक्षक युसुफ शेख, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त माया केदार, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. विनय राठोड, तहसीलदार शीतल सोलट, जिल्हा माहिती अधिकारी यांचे प्रतिनिधी तानाजी घोलप आदी उपस्थित होते.
श्री. शर्मा म्हणाले,  लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेली विविध पथके, समितीतील सदस्य यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी. निवडणुकीत पैशाचा व मद्याचा वापर होणार नाही, याची दक्षता घ्यावी. नवमतदार नोंदणीकरिता राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत जिल्ह्यात चांगले काम झाले आहे. आता निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रम प्रभावीपणे राबवावा. गतवेळी ज्या मतदान केंद्रांवर मतदानाची टक्केवारी कमी आहे, अशा ठिकाणी विशेष प्रयत्न करून मतदानाचा टक्का वाढवावा. महिला मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यावर भर दिला जावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. जिल्हा पोलीस दलामार्फत पथनाट्याद्वारे मतदार जागृतीसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नाचे त्यांनी यावेळी कौतुक केले.
मतदान यंत्र हाताळणीबाबत सर्व मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करून त्यांना आवश्यक सूचना द्याव्यात. सर्व मतदान केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. ज्या ठिकाणी कोणतेही नेटवर्क नाही, अशा मतदान केंद्रांवर संपर्कासाठी पर्यायी उपाययोजना करण्याच्या सूचनाही श्री. शर्मा यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज असून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. निवडणूक खर्च संनियंत्रणासाठी जिल्ह्यात विविध पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. तसेच निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था याबाबत संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. मतदान यंत्रांचे प्रथम सरमिसळीकरण करून ही मतदान यंत्रे विधानसभा मतदारसंघनिहाय वितरीत करण्यात आली आहेत. ‘स्वीप’ च्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात येणार असून कोणत्याही प्रकारच्या आमिषांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. परदेशी म्हणाले, निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस दलामार्फत सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये प्रतिबंधात्मक स्वरूपाच्या कारवाया सुरु आहेत. मतदान केंद्रांवर आवश्यक पोलीस बंदोबस्त देण्यात येणार असून निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस दल प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
कायदा व सुव्यवस्था, टपाली मतदान, मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या किमान मुलभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, दिव्यांग मतदारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा आदी विषयांचाही श्री. शर्मा यांनी यावेळी आढावा घेतला. भारत निवडणूक आयोगाने सुधीरकुमार शर्मा यांची यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक म्हणून नियुक्ती केली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक  ९४२२८७२०१० असा आहे.