सर्व महिलांनी मतदानाचा हक्क बजावावा- जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे

0
15

बचतगटांच्या महिलांशी साधला संवाद
गोंदिया दि.२८. : आपण कोणाला मतदान केले हे व्हीव्हीपॅट मशिनच्या माध्यमातून दिसून येणार आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया विश्वासपूर्ण व पारदर्शक झाली आहे. महिला कुठेतरी कमी आहेत ही भावना बचतगटामुळे दूर झाली आहे. त्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. येत्या ११ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत सर्व महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
आज २८ मार्च रोजी गोंदिया तालुक्यातील पिंडकेपार येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेत मतदार जागृती अभियानाअंतर्गत महिला मतदारांशी संवाद साधतांना डॉ.बलकवडे बोलत होत्या. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, गोंदिया तहसिलदार राजेश भांडारकर, गोंदिया अपर तहसिलदार अनिल खडतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिला बचतगटाच्या माध्यमातून त्यांच्या गटाचा लेखाजोखा व्यवस्थीत ठेवत असल्याचे सांगून डॉ.बलकवडे म्हणाले, यावरुन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. ज्या दिवशी मतदान करायचे आहे त्या दिवशी कुणाला मतदान करायचे आहे याबाबतचा निर्णय त्यांनी घ्यावा. महिलांनी निवडणूकीच्या काळात पैशाच्या प्रलोभनला बळी पडू नये. निवडणूकीत पैसे घेणे आणि देणे हा भ्रष्टाचार आहे. निवडणूकीत महिलांनी निर्भयपणे मतदान करावे. गावातील कोणतीही महिला मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. गावातील १८ वर्षावरील सर्व मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहीत करावे असेही त्यांनी सांगितले.
श्री.खडसे म्हणाले, भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. मतदार हा राजा आहे. निवडणूक प्रक्रिया ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमुळे गतीमान व पारदर्शक झाली आहे. प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक बळकट करावी. शंभर टक्के मतदानामुळे आपल्याला अपेक्षीत व कार्यक्षम उमेदवार निवडून देता येईल. मतदानाबाबतची उदासिनता दूर करुन सर्व मतदारांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे सांगितले.
श्री.सोसे म्हणाले, गावातील बचतगटातील सर्व महिला स्वत: मतदान करुन गावातील सर्व मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहित करतील. गावातील एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची दक्षता बचतगटातील महिला घेतील असे ते म्हणाले.प्रारंभी मंडळ अधिकारी पी.सी.शर्मा व तलाठी जी.पी.सोनवाणे यांनी उपस्थित महिलांना ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीन याबाबतचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. व्हीव्हीपॅट मशिनच्या माध्यमातून आपण कोणाला मतदान केले हे दिसणार असल्याचे त्यांनी उपस्थित महिलांना व नागरिकांना सांगितले. उपस्थित महिलांनी मतदानाची यावेळी प्रात्यक्षिके केली व त्यांच्या मनात असलेल्या शंकांचे समाधान केले.
कार्यक्रमाचे संचालन अनिता बडगे यांनी केले व उपस्थितांचे आभार सुर्यकांता मेश्राम यांनी मानले. यावेळी पिंडकेपार येथील महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत कार्यरत झाशीची राणी महिला ग्रामसंस्थेच्या बचतगटातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदिप कुकडकर, मोनिता चौधरी, प्रफुल अवघड, दिपाली सोळंके यांच्यासह गावातील बचतगटाच्या महिलांनी परिश्रम घेतले.