निवडणूक आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करा-निवडणूक निरीक्षक विनोद सिंह गुंजीयाल

0
15
  • नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक

वाशिम, दि. २८ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक शांततामय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना अकोला लोकसभा मतदारसंघाचे सामान्य निवडणूक निरीक्षक विनोद सिंह गुंजीयाल यांनी आज दिल्या. रिसोड येथे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा वाशिमचे उपविभागीय अधिकारी पी. एस. राऊत, रिसोडचे तहसीलदार आर. यु. सुरडकर, मालेगावचे तहसीलदार रवी काळे, निवडणूक खर्च समितीचे एस. जी. कडेकर, नायब तहसीलदार श्री. देवळे यांची प्रमुख्य उपस्थिती होती.

श्री. गुंजीयाल म्हणाले, निवडणूक प्रक्रिया शांततेत व कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पाडण्यासाठी सर्वांनी सतर्क राहावे. सर्व मतदान केंद्रानावर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची खात्री करून घ्यावी. दिव्यांग मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर व्हीलचेअर आणि मदतनीस उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मतदारांची संख्या लक्षात घेऊन मतदान केंद्रांवर आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी सर्व संबंधित पथकांनी काळजीपूर्वक काम करावे. उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचे संनियंत्रण करण्यासाठी नियुक्त पथकांनी उमेदवाराच्या प्रत्येक खर्चाची नोंद घेण्याच्या सूचना श्री. गुंजीयाल यांनी केल्या.निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेली भरारी पथके, स्थायी निरीक्षण पथके, तपास नाके, मतदान केंद्रांवरी उपलब्ध सुविधा, कायदा व सुव्यवस्था, स्वीप कार्यक्रम आदी बाबींचा श्री. गुंजीयाल यांनी यावेळी आढावा घेतला. तत्पूर्वी त्यांनी मालेगाव तालुक्यातील मुंगळा व गोकसावंगी येथील मतदान केंद्रांना भेट देवून तेथील उपलब्ध सुविधांची पाहणी केली.

वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघ अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट आहे. अकोला लोकसभा मतदारसंघासाठी सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने विनोद सिंह गुंजीयाल यांची नियुक्ती केली आहे. ते अकोला येथील बस स्थानकाजवळील शासकीय विश्रामगृह येथील कार्यालयात दुपारी ४ ते सायंकाळी ५ वा. कालवधीत उपलब्ध असणार आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९९२१८६६६६८ अशा असून कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०७२४-२४१४८२९ हा आहे.