नागपुरातून ३0 तर रामटेकमधून १६ उमेदवार

0
13

नागपूर,दि.29ः- रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा गुरुवार शेवटचा दिवस होता. त्यात नागपुरातून ३ उमेदवारांनी तर रामटेकमधून ५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्गल यांनी पत्रपरिषदेत दिली.
नागपुरातून ३९ उमेदवारांनी लोकसभेसाठी अर्ज दाखल केले होते. यापैकी अर्ज तपासणी प्रक्रियेत ६ उमेदवारांचे अर्ज रद्द करण्यात आले आणि ३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता नागपूर मतदार संघातून ३0 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. रामटेक मतदार संघातून २४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी तपासणीत ३ अर्ज रद्द करण्यात आले. ५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आत्ता रामटेक मतदार संघातून १६ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.
निवडणुक प्रक्रियेसाठी २ बॅलेट युनिटचा वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक बॅलेटमध्ये १५ उमेदवार आणि १ नोटा असणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी २ निवडणूक अधिकार्‍यांची नेमणूक केली आहे. १८ मार्चपासून अधिकारी कामावर रुजू झाले आहेत. सामान्य निरीक्षणासाठी आंध्रप्रदेशातील शारदा देवी आणि ओडीसा येथील प्रसन्नकुमार झेना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुक सर्वेक्षणासाठीही २ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या प्रक्रियेनंतर निवडणूक चिन्ह वाटप प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना राखीव चिन्हे निवडणुकीसाठी देण्यात आली आहेत. ईतरांना त्यांच्या आवडीप्रमाणे निवडणुक चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. उमेदवारांची यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बॅलेट पेपर प्रिंटींगची प्रक्रिया पुढील दोन दिवसात पूर्ण होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकार्‍यांनी पत्रपरिषदेत दिली. सर्व मतदान केंद्रावर मतदान कर्मचार्‍यांची उपलब्धता करण्यात आली आहे. मतदानाच्या दोन दिवसाआधी या कर्मचार्‍यांना त्यांना कोणत्या मतदान केंद्राची जबाबदारी देण्यात आली आहे, हे सांगण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर काम करण्यासाठी ३ ते ५ एप्रिलदरम्यान कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
१0 एप्रिलला अंतिम प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मतदान साहित्याची उपलब्धता अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या २ दिवसात सर्व साहित्य उपलब्ध होणार आहे. नागपूर आणि रामटेक लोकसभा क्षेत्रात ४३८२ मतदान केंद्र राहणार आहेत. यापैकी २२३७ मतदान केंद्र नागपुरात आणि २२३२ मतदान केंद्र रामटेक येथे राहणार आहेत. सर्व उमेदवारांना निवडणूक प्रक्रिया, निवडणुकीत अपराध मानल्या जाणार्‍या गोष्टी आणि निवडणुकीसाठी लागणार्‍या खर्चाबद्दल निवडणूक अधिकार्‍यांनी माहिती दिली आहे, अशी माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शाह आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके उपस्थित होते.