राष्ट्रवादी व भाजपाचे उमेदवार कोट्याधीश

0
16

भंडारा/गोंदिया,दि.29 : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे उमेदवार कोट्यवधीच्या संपत्तीचे मालक निघाले आहेत. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रानुसार राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्याकडे पाच कोटी १९ लाख रुपयांचे तर भाजपाचे उमेदवार सुनील मेंढे ४२ कोटी ७३ लाख रुपयांची संपत्ती आहे. यात चल-अचल आणि सुवर्ण आभूषणांचा समावेश आहे.
भाजपाचे उमेदवार सुनील बाबुराव मेंढे पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवित आहे. त्यांच्याकडे ३ कोटी ५७ लाख ५१ हजार ४९२ रुपयांची चल संपत्ती संपत्ती आहे. यात एक लाख १२ हजार ३०० रुपये रोख तर बँकेच्या खात्यांमध्ये ३ लाख ७५ हजार ९६१ रुपये ठेवले आहे. मेंढे यांचे स्वामित्व असलेल्या कंस्ट्रक्शन कंपनीच्या मालकीचे १ ट्रॅक्टर, एक पिकअप व्हॅन व दोन कार आहेत. त्यांच्यावर १ कोटी ८३ लाख ९६ हजार तर पत्नीच्या नावे १४ लाख ६४ हजार रुपयांची कर्ज असल्याचे या शपथपत्रात म्हटले आहे. मेंढे यांची ३९ कोटी १६ लाख ३५ हजार रुपयांची अचल संपत्ती आहे. यात विविध ठिकाणी शेतजमीन, घर आदींचा समावेश आहे.
राष्टÑवादीचे उमेदवार नाना जयराम पंचबुध्दे यांच्याकडे एक कोटी ४१ लाख २० हजार ३०८ रुपयांची चल संपत्ती आहे. त्यांची पत्नी पुष्पा पंचबुध्दे यांच्या नावाने २० लाख २५१० चल संपती असल्याची माहिती शपथपत्रात दिली आहे. पंचबुध्दे यांच्याकडे ९५ हजार रुपये रोख रक्कम असून म्युच्युअल फंडात सहा ठिकाणी १३ लाख ३१ हजार ९५८ रुपये गुंतविले आहेत. भारतीय पोस्ट खात्यात ९८ हजार रुपये डिपॉझीट तर एलआयसीमध्ये १३ लक्ष ९९ हजार रुपये किंमतीची सरेंडर असणारी पॉलिसी आहे. म्हाडा अंतर्गत प्लॉट खरेदीसाठी २४ लाख रुपये आगाऊ रक्कम दिल्याचे या शपथपत्रात नमूद आहे.
त्यांच्या पत्नीच्या नावाने ५४ हजार रुपयांची रोख तर म्युच्युअल फंडात ३ लाख ८५ हजार ४४० रुपये गुंतविले आहे. पंचबुध्दे यांनी बालाजी राईस इंडस्ट्रीजमध्ये पार्टनरच्या स्वरुपात ६२ लाख ६२५ रुपये गुंतविल्याचे नमुद केले आहे. पंचबुध्दे यांच्याकडे तीन कोटी ७१ लाख ४०हजार रुपयांची तर त्यांची पत्नी पुष्पा यांच्याकडे ३५ लाख रुपयांची अचल संपदा आहे.यासोबतच या निवडणूक रिंगणात असलेल्या इतर उमेदवारांनीही आपल्याकडे असलेल्या संपत्तीची माहिती शपथपत्रावर निवडणूक आयोगाकडे दिली आहे.
मेंढे यांच्याकडे २५० ग्रॅम सोने असून त्याची किंमत ८ लाख २५ हजार रुपये तर त्यांच्या पत्नी शुभांगी मेंढे यांच्याकडे २६ लाख ४० हजार रुपयांचे सोने व अन्य दागीने आहेत. तर नाना पंचबुध्दे यांच्याकडे ९ लाख ६० हजार रुपये किंमतीचे ३०० ग्रॅम सोने असून त्यांच्या पत्नीकडे ४५० ग्रॅम सोने असून त्याची किंमत १४ लाख ४० हजार रुपये आहे. तसेच ५२० ग्रॅम चांदी असल्याचेही नमूद केले आहे.
पंचबुद्धे यांच्याकडे सात कंपन्यांचे १४ लाख ७५ हजार ४१४ रुपयांचे शेअर्स असून त्यांच्या पत्नीच्या नावे दोन कंपन्यांचे एक लाख एक हजार रुपयांचे शेअर्स आहेत. सुनील मेंढे यांनी विविध बॉण्ड, म्युचल फंड, विमा व अन्य बचत अंतर्गत एकुण ३ कोटी ५७ लाख ९१ हजार ४९२ रुपयांची गुंतवणूक केली आहे.तर  मेंढे यांना विविध आस्थापना, बँक, कंपनी यांचे एकूण १ कोटी ८३ लाख ९६ हजार ७१९ रूपयांचे देणे बाकी आहे. पंचबुध्दे यांच्यावर महिला भंडारा नागरी सहकारी पतंसंस्थेचे २० लक्ष ५० हजार १३४ रुपयांचे कर्ज दाखविले आहे.