कारंजा येथे निवडणूक खर्च विषयक पथक प्रमुखांची बैठक

0
25
????????????????????????????????????

वाशिम, दि. ३० : निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी व  निवडणूक चिन्ह वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता प्रचाराला सुरुवात होईल. प्रचारासाठी उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चाची नोंद घेण्यासाठी तसेच निवडणूक काळात मद्याचा व पैशाचा वापर होऊ नये, यासाठी निवडणूक खर्च विषयक सर्व पथकांनी सजगपणे काम करण्याच्या सूचना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक विक्रम पगारिया यांनी आज दिल्या. कारंजा येथील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कारंजाचे उपविभागीय अधिकारी अनुप खांडे, सहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक योगेश क्षीरसागर, कारंजाचे तहसीलदार रणजीत भोसले, मानोराचे तहसीलदार सुनील चव्हाण, निवडणूक खर्च संनियंत्रण समितीचे युसुफ शेख यांच्यासह कारंजा विधानसभा मतदारसंघातीलनिवडणुकीसाठी खर्च निरीक्षण पथक, लेखा पथक, भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्व्हेक्षण पथक (एसएसटी), व्हीडीओ सर्व्हेक्षण पथक (व्हीएसटी), व्हीडीओ पाहणी पथक (व्हीव्हीटी) पथकांचे प्रमुख उपस्थित होते.

श्री. पगारिया म्हणाले, कारंजा विधासभा मतदारसंघात कार्यान्वित करण्यात आलेल्या सर्व स्थिर सर्वेक्षण पथकाने बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या जास्तीत जास्त वाहनांची तपासणी करावी. प्रत्येक स्थिर सर्वेक्षण पथकाने तपासणी केलेल्या वाहनांची योग्य नोंद रजिस्टरमध्ये घ्यावी. ‘सी-व्हीजील’वर प्राप्त झालेल्या तक्रारी तसेच दूरध्वनी व इतर माध्यमातून तक्रारींची दखल घेवून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची जबाबदारी भरारी पथकांची आहे. या भरारी पथकांनी निवडणूक काळात मद्य व पैशाचा वापर होऊ नये, यासाठी हॉटेल, धाबा व पेट्रोलपंप यांना अचानक भेटी देवून तपासणी करावी. तसेच जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर वेगवेगळ्या ठिकाणी अचानक तपासणी मोहीम घेवून वाहनांची तपासणी करावी. या तपासणी मोहिमेचे स्वतंत्र रजिस्टर तयार करावे. स्थिर सर्वेक्षण पथक व भरारी पथकाने केलेल्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. व्हीडीओ सर्व्हेक्षण पथक (व्हीएसटी), व्हीडीओ पाहणी पथक (व्हीव्हीटी) आणि लेखा पथक यांच्यामार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावाही श्री. पगारिया यांनी यावेळी घेतला.

स्थिर सर्वेक्षण पथकांच्या ठिकाणांची पाहणी

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक खर्च निरीक्षक विक्रम पगारिया यांनी आज कारंजा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील चार स्थिर सर्वेक्षण पथकांच्या ठिकाणी जावून तेथील कामकाजाची पाहणी केली. यामध्ये दोनद, खेर्डा, धनज व सोमठाणा या चार स्थिर सर्वेक्षण पथकांचा समावेश आहे.