निवडणूका म्हणजे लोकशाहीची खरी परीक्षा — निवडणूक निरिक्षक पार्थ सारथी मिश्रा

0
16

Ø  समन्वयाने व पारदर्शकतेने कार्य करा

Ø  प्रत्येक टप्प्यावर काळजी घ्या

Ø  निवडणूक आढावा बैठक

भंडारा,दि. 30 – निवडणूक या लोकशाहीची खरी परीक्षा असतात. समन्वयाने व पारदर्शकतेने निवडणूकीला सामोरे गेल्यास लोकांचा लोकशाहीवरील विश्वास वृध्दींगत होतो. भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघासाठी  11 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणूकीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. पारदर्शकतेला महत्व देतांनाच निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर काळजी घेण्यात यावी. काही अडचण असल्यास निवडणूक निरिक्षक व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. प्रत्येक तक्रारीचे निवारण होईल यावर लक्ष देण्यात यावे. विशेष म्हणजे आपल्या कामात कुठलीही हयगय होऊ देवू नका, अशा सूचना निवडणूक मुख्य निरिक्षक पार्थ सारथी मिश्रा यांनी दिल्या.

            आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस निवडणूक निरिक्षक सचिन बादशाह,  निवडणूक खर्च निरिक्षक नाकिडी सृजनकुमार, जिल्हाधिकारी शांतनू गोयल, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रमोद भुसारी, सुभाष चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे,उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसिलदार यावेळी उपस्थित होते.

            मुख्य निवडणूक निरिक्षक पार्थ सारथी मिश्रा यांनी निवडणूकीच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी सादरीकरणाद्वारे निवडणूक तयारीची माहिती दिली.  लोकसभेसाठी 18 लाख 8 हजार 948 मतदार आहेत. मतदार जागृतीसाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न केल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. दिव्यांग मतदारासाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा असणार आहे. भंडारा जिल्हयात दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरची सुविधा असेल, असे ते म्हणाले.

            मतदान केंद्रात पुरेसा लाईट रॅम्प, पिण्याचे पाणी इत्यादी मुलभूत  सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पुरेसे मनुष्यबळ असून मतदानाच्या चार ते पाच दिवसाअगोदर मतदान केंद्र अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक घरी फोटो व्होटरस्लिप पोहचविण्यात येणार आहे. या स्लिपसोबत मतदान अवश्य करा, असा जिल्हाधिकारी यांचा संदेश असलेले पत्र देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे 50 हजार संकल्प पत्र शाळांमधून भरुन घेतले आहेत. कायदा व सुव्यवस्था चोख असेल असे ते म्हणाले.

आचारसंहितेबाबतच्या तक्रारीचा तात्काळ निपटारा करण्यात येणार आहे. अधिकारी कर्मचारी व पोलीस यांचे प्रशिक्षण ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सुक्ष्म निरिक्षक यांचे प्रशिक्षण 7 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. अवैध मद्यावर निर्बंध घालण्यात येत असून गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी विविध ठिकाणी चेक पोस्ट व तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. फिरते मोबाईल पोलीस स्टेशन या उपक्रमातून मतदार जागृती सुध्दा करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

            मुख्य निवडणूक निरिक्षक पार्थ सारथी मिश्रा यावेळी बोलतांना म्हणाले की, निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेली तयारी समाधानकारक आहे. प्रत्येक यंत्रणेनी समन्वयाने काम करणे आवश्यक असून एकमेकांशी संवाद ठेवून काम करावे, असे ते म्हणाले. निवडणूक काळजीपूर्वक हातळण्यात यावी. कुठलीही कमतरता राहू नये यासाठी नियोजन आराखडा बनवून त्यानुसार काम करण्याचा सल्ला मिश्रा यांनी दिला.  प्रत्येक टप्प्यावर काळजी घ्या आम्ही सोबत आहोत, असे सांगून  मिश्रा म्हणाले की,  ही निवडणूक आपण उत्तम समन्वय ठेवून निर्विघ्न पार पाडू.