निवडणूक खर्च तपासणीस सहा उमेदवार अनुपस्थित  

0
16

यवतमाळ, दि.7 : निवडणूक खर्च तपासणीच्या दुस-या बैठकीस सहा उमेदवार / प्रतिनिधी अनुपस्थित असल्याने त्यांना नोटीस बजावण्याचे आदेश निवडणूक खर्च निरीक्षक विक्रम पगारीया यांनी दिले. उमेदवारांकडून निवडणुकीत करण्यात येणा-या खर्चाची द्वितीय तपासणी गार्डन हॉल,जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आली.

14 यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 11 एप्रिल रोजी होणार आहे. नामनिर्देशन पत्र भरण्याच्या दिनांकापासून उमेदवारांचा खर्च सुरू होतो. या निवडणूक प्रक्रियेदरम्यान उमेदवारांकडून होणारा दैनंदिन खर्च निवडणूक खर्च सनियंत्रण कक्षाकडे सादर करणे बंधनकारक आहे. या खर्चाची तपासणी केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) यांच्याकडून तीन वेळा करण्यात येते. यापैकी प्रथम तपासणी 2 एप्रिल रोजी झाल्यानंतर द्वितीय तपासणी 5 एप्रिल रोजी करण्यात आली.

द्वितीय तपासणीदरम्यान एकूण 24 उमेदवारांपैकी 18 उमेदवार / त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तर अनुपस्थित सदस्यांमध्ये सुनील नटराजन नायर उर्फ प्रेमासाई महाराज, रमेश गोरसिंग पवार, पुरुषोत्तम अजगवरे, उत्तम कांबळे, पुंडलिक राठोड, नुर अली मेहबूब अली शहा यांचा समावेश आहे. अनुपस्थित असणा-या उमेदवारांना नोटीस देण्याचे आदेश निवडणूक निरीक्षक विक्रम पगारीया यांनी दिले आहे. अनुपस्थित उमेदवाराने नोटीस प्राप्त झाल्यापासून 48 तासांच्या आत त्यांची दैनंदिन खर्च नोंदवही सनियंत्रण कक्षापुढे सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा भारतीय दंडसंहिता 171 (1) नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच त्यांना देण्यात आलेली वाहनांची परवानगी रद्द केली जाऊ शकते.

प्रथम खर्च तपासणीत निवडणूक निरीक्षकांनी जे मुद्दे उपस्थित केले होते, त्यातील बहुतांश मुद्दे उमेदवारांनी मान्य करून आपल्या निवडणूक खर्चात समाविष्ठ केले आहेत. द्वितीय खर्च तपासणीवेळी उमेदवारांच्या निवडणूक खर्च नोंदवही व खर्च सनियंत्रण कक्षातील शॅडो ऑब्जर्व्हेशन रजिस्टरमधील तफावतीबाबत उमेदवारांना नोटीस देण्याची कार्यवाही सुरू आहे.लोकप्रतिनिधी कायदा कलम 77 (1) नुसार उमेदवाराला दैनंदिन खर्चाची नोंदवही अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. नागरिकांनी देखील निवडणूक खर्चाबाबत काही तक्रारी असल्यास expenditureobserverytlwsm२०१९@gmail.com   किंवा 9530400015 या क्रमांकावर संपर्क करावा,  असे आवाहन निवडणूक निरीक्षक विक्रम पगारीया यांनी केले आहे.