‘क्रॉपसॅप’ प्रकल्पाबाबत कृषी सहायक व पर्यवेक्षकांची कार्यशाळा

0
38

गडचिरोली,दि.२६: शेतकऱ्यांना कीड रोगांविषयी शास्त्रोक्त सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी असलेल्या ‘क्रॉपसॅप’ प्रकल्पासंदर्भात येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील कृषी सहायक व पर्यवेक्षकांची कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत धान, कापूस व सोयाबीन पिकाच्या पेरणीपासून तर मळणीपर्यंत प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांकडून निरीक्षण करुन घेऊन त्यांना मार्गदर्शन कसे करावे, याविषयीची माहिती तज्ज्ञांनी कृषी सहायक व पर्यवेक्षकांना दिली.

या कार्यशाळेला नागपूर येथील कृषी विभागाच्या अधीक्षक कृषी अधिकारी प्रज्ञा गोडघाटे, गडचिरोलीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ज्ञ श्री. बोठेकर, श्री. बुधवार, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिराळकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायक उपस्थित होते.

जिल्ह्यात २०१९-२० या हंगामात क्रॉपसॅप प्रकल्पाशी १८० शेतीशाळा प्रत्यक्ष शेतावर जाऊन आयोजित करण्यात येणार आहेत. याद्वारे सुमारे ४ हजार ५०० शेतकऱ्यांना प्रशिक्षणाद्वारे प्रत्यक्ष अनुभवावर आधारित धान, सोयाबीन व कापूस पिकाचे तज्‍ज्ञ शेतकरी बनविण्यात येणार आहे. कार्यशाळेच्या आयोजनासाठी कृषी विभागाचे चंद्रकांत ठाकरे, दिनेश पानसे, मारोती वरभे, सोमेश्वर क्षीरसागर, जयदेव भाकरे, मनोहर दुधबावरे यांनी सहकार्य केले.