कामगारांनी विधी सेवेचा लाभ घ्यावा – एम.बी.दुधे

0
22

गोंदिया,दि.04 : सर्वांना समान न्याय मिळावा याकरीता पात्र व्यक्तींना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय गोंदिया व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत मोफत विधी सहाय्य दिले जाते. कामगार आपल्या न्यायापासून वंचित राहू नये, त्यांना त्यांचे हक्कापासून कोणीही वंचित ठेवू नये. यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाकडून संबंधीत व्यक्तीला मोफत विधी सहाय्य व मोफत वकील मिळवून देवू शकतो. असे मत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एम.बी.दुधे यांनी व्यक्त केले.
जागतिक कामगार दिनानिमीत्त एस.टी.आगार गोंदिया येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ व एस.टी.डेपो आगार गोंदिया यांच्या संयुक्त वतीने कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एम.बी.दुधे, तर प्रमुख अतिथी म्हणून सह दिवाणी न्यायाधीश एन.आर.वानखडे, ॲड.कौशल्या खटवानी व ॲड.मंगला बंसोड उपस्थित होते.
यावेळी सह दिवाणी न्यायाधीश एम.आर.वानखडे म्हणाले, कामगार वर्गासाठी उद्योजकता निर्माण करण्यासाठी भूमी, भांडवल, संयोजक व श्रम या चार गोष्टी असणे आवश्यक आहे. कामगार वर्गांना त्यांचे हक्क व अधिकारांची जाणिव झाली तेव्हा त्यांच्यात एक संघटना निर्माण झाली व त्यामुळे श्रमिक संघटना ही सक्षम बनली. कोणत्याही वर्गाचा विकास करायचा असेल तर सर्वप्रथम संघटीत होणे आवश्यक आहे. एखादा श्रमिक काम करीत असतांना अचानक दुखापत झाली किंवा अपघात झाला तर अशा कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याची व्यवस्था आहे. एखादया ठिकाणी एखादी महिला व पुरुष काम करीत असेल तर त्यांना समान वेतन देणे ही मालकावर संविधानिक जबाबदारी आहे व ते कामगाराच्या समानतेचा अधिकार आहे, त्यांच्यात भेदभाव करता येणार नाही असे त्यांनी सांगितले.
कामाच्या ठिकाणी कंपनी कायदयानुसार कामगारांना योग्य त्या सुविधा पुरविणे ही मालकाची जबाबदारी आहे असे ॲड.कौशल्या खटवानी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. कामगारांना नियमानुसार किमान वेतन दयावे ही मालकाची जबाबदारी आहे व तो न दिल्यास गुन्हा ठरतो असे ॲड.मंगला बंसोड म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड.सुनिता चौधरी यांनी केले. उपस्थितांचे आभार एस.टी.आगारचे लेखापाल प्रमोद बारई यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर.जी.बोरीकर, एस.एम.कठाणे, पी.एन.गजभिये, एल.पी.पारधी, एस.एस.पारधी तसेच पॅरालीगल व्हालंटीयर गुरुदयाल जैतवार यांनी सहकार्य केले.