पोलिसांकडून आदिवासींची पिळवणूक”

0
16

गडचिरोली, दि.2: नक्षल असल्याच्या संशयावरुन पोलिस निरपराध आदिवासींची पिळवणूक करीत असल्याचा आरोप करुन पीडित व्यक्तींचे नातेवाईक व भकप, भारिप-बमसं नेत्यांनी दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
भाकपचे नेते डॉ.महेश कोपुलवार, भारिप-बमसंचे नेते रोहिदास राऊत यांनी पत्रकार परिषदेत पोलिसांच्या पिळवणुकीसंदर्भातील दोन घटना विस्तृतपणे सांगितल्या. एक घटना चामोर्शी तालुक्यातील पुसेर येथील लीलाधर गणू कोवासे या इसमाबाबतची आहे. पत्रकार परिषदेला उपस्थित लीलाधरचे वडील गणू कोवासे यांनी सांगितले की, २३ मार्चला गडचिरोली येथे भारत जनआंदोलन व आदिवासी महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने संघर्ष रॅली व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत सहभागी होण्यासाठी पुसेर येथील सुमारे १८ जण गडचिरोलीला आले होते. जाहीर सभा संपल्यानंतर सर्वजण आपल्या वाहनाकडे जात असताना इंदिरा गांधीचौकानजीकच्या वनविभागाच्या कार्यालयाजवळ साध्या वेशातील पोलिसांनी आपला मुलगा लीलाधर यास पकडून पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर सर्वजणांनी पोलिस ठाण्यात जाऊन “तुम्ही लीलाधरला कशासाठी ताब्यात घेतले”, अशी विचारणा केली असता, पोलिसांनी “चौकशीनंतर त्यास सोडून देऊ” असे उत्तर दिले. त्यामुळे आम्ही सर्वजण गावी परतलो. या घटनेला ९ दिवस उलटूनही पोलिसांनी लीलाधरला सोडले नाही. यासंदर्भात निवेदन देऊन पोलिस अधीक्षकांना विचारणा केली असता त्यांनी “आम्ही लीलाधरला सोडले आहे” असे उत्तर दिले. मग, लीलाधर गेला कुठे, असा सवाल लीलाधरचे वडील गणू कोवासे, तसेच डॉ.महेश कोपुलवार व रोहिदास राऊत यांनी केला. वर्षभरापूर्वीच लीलाधरचे लग्न झाले असून, त्याला तीन महिन्यांची मुलगी आहे. लीलाधरची पत्नीदेखील आपल्या चिमुकल्या कन्येसह पत्रकार परिषदेला उपस्थित होती. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
दुसरे प्रकरण एटापल्ली तालुक्यातील कसनसूर पोलिस ठाण्यांतर्गत गडेरी येथील आहे. गडेरी येथील ईसू पांडू तिम्मा(५०) या इसमाला सी-६० पथकाच्या पोलिसांनी उचलून नेले. तोदेखील अद्याप बेपत्ताच आहे. यासंदर्भात ईसूचे भाऊ महारु पांडू तिम्मा यांनी पत्रकारांना सांगितले की, १९ मार्चला गावात देवपूजा सुरु असताना दुपारी १२ वाजताच्या सुमारास सी-६० पथकाचे काही जवान गावात आले. त्यांनी ईसू तिम्मा यास बेदम मारहाण केली. यावेळी गावकऱ्यांनी पोलिसांना “तुम्ही मारहाण कशासाठी करता”, असे विचारले असता “तुम्ही मध्ये बोलू नका, तुमचे काही काम नाही”, असे उत्तर देऊन ईसूला आपल्या सोबत नेले. दुसऱ्या दिवशी गावकरी कोटमी पोलिस ठाण्यात गेले असता, तेथील पोलिस निरीक्षकाने गावकऱ्यांचे समाधान न करता त्यांना परत पाठविले. १३ दिवस लोटूनही ईसू तिम्मा गावात परतलेला नाही.
यासंदर्भात आपण पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन विचारणा केली असता ईसूने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले असून, त्याला जिल्हा दंडाधिकाऱ्यांपुढे हजर केल्यानंतर धनादेश देऊन परत पाठवू, असे उत्तर दिल्याची माहिती ईसूचे भाऊ महारु तिम्मा, डॉ. महेश कोपुलवार व रोहिदास राऊत यांनी पत्रकारांना दिली. उपरोक्त दोन्ही प्रकरणांची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद सदस्य अमोल मारकवार, देवराव चवळे, महेश राऊत, अॅड. जगदीश मेश्राम यांच्यासह पुसेर व गडेरी येथील नागरिक उपस्थित होते.