घिसू तिम्मा व लीलाधर कोवासे यांचे आत्मसमर्पण

0
13

गडचिरोली, ता.2: एटापल्ली तालुक्यातील गडेरी येथील मंगू उर्फ घिसू पांडू तिम्मा(४५) व पुसेर येथील नरेश उर्फ लीलाधर गणू कोवासे हे नक्षलवादी असून त्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याचा दावा बुधवारी पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
आजच घिसू तिम्मा व लीलाधर कोवासे यांचे नातेवाईक तसेच भाकप नेते डॉ.महेश कोपुलवार आणि भारिप-बमसंचे नेते रोहिदास राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिस दोघांची पिळवणूक करीत असल्याचा आरोप करुन या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक काढून घिसू तिम्मा व लीलाधर कोवासे हे नक्षलवादीच असल्याचे सांगून त्यांनी आत्मसमर्पण केल्याचा दावा केला. घिसू तिम्मा हा जनमिलिशिया कमांडर होता. तसेच तो कसनसूर दलममध्ये कार्यरत होता. त्याने २१ मार्च रोजी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. लीलाधर कोवासे हा चातगाव एलओएसचा सदस्य होता. त्याने आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याचे सांगून त्यांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला जबरदस्त हादरा बसल्याचेही पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.