पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढा- पालक सचिव नंदकुमार

0
14
????????????????????????????????????

वाशिम, दि. १८ : गावामध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाई निवारणासाठी संबंधित ग्रामपंचायतीने ठराव घेवून सुचविलेल्या उपाययोजनेच्या प्रस्तावावर तात्काळ निर्णय नागरिकांना पाणी पुरवठा सुरु केला जावा. पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनेचा प्रस्ताव प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता संबधितांनी घ्यावी, असे निर्देश पालक सचिव नंदकुमार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले.

यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बी. एस. बोरकर यांच्यासह सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी अधिकारी उपस्थित होते.

श्री. नंदकुमार म्हणाले, कोणत्याही गावात पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर त्याठिकाणी तातडीने उपाययोजना करून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करून उपाययोजनेचा प्रस्ताव पाठविल्यानंतर पुढील आवश्यक कार्यवाही गतीने होवून पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४२३ गावांत पाणी पुरवठा योजनेद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. या योजनांद्वारे करण्यात येत असलेला पाणी पुरवठा ग्रामस्थांना व्यवस्थित मिळत आहे की नाही, याची खात्री ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने करावी. ज्या गावांना पाणी टंचाईची समस्या नेहमी भेडसावते अशा गावांसाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी काही तरी नवीन प्रकारे काम केले पाहिजे. ग्रामस्थांच्या संकल्पनेतून व त्यांच्या सहभागातून पाणी टंचाई निवारणाच्या उपाययोजना केल्या पाहिजेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असल्याचे सांगून श्री. नंदकुमार म्हणाले, ज्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावतो आहे, त्या गावांनी प्रशासनाला अवगत करावे. तसेच ग्रामपंचायतीने त्याबाबतचा ठराव घेवून प्रशासनाला पाठवावा. त्यामुळे पाणी टंचाई निवारणासाठी तातडीने उपाययोजना करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे सूक्ष्म नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ज्या गावामध्ये रोजगाराची आवश्यकता आहे, तेथील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे रोजगाराची मागणी करावी, असे ते यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री. मोडक यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील ३५ गावांना ४६ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. १८४ गावांत २५३ विहिरींचे अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरु आहे. तसेच जिल्ह्यातील सात नळ पाणी पुरवठा विशेष दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून यासाठी ५५ लक्ष ७२ हजार १७६ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रिसोड तालुक्यात ४३ कोटी ९९ लक्ष रुपये दुष्काळ अनुदान म्हणून ५३ हजार ११५ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. जिल्ह्यात स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत ४ हजार १४२ कामे शेल्फवर असून या कामांमुळे १२ लाख ७९ हजार १४० मजूर क्षमता निर्माण होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांना तातडीने मंजुरी देण्याच्या अनुषंगाने टँकर मंजुरीचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.