हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद आज 45 अंश सेल्सिअस

0
9

गोंदिया, दि.25: मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून आज शनिवार(दि.25)ला जिल्ह्यात 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.तर  मंगळवारला 21 मे रोजी  जिल्ह्यात ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती.आजचे तापमान हे या हंगामातील सर्वाधिक तापमान असून मे महिन्यातील आत्तापर्यंतच्या तापमानाचे रेकार्ड मोडले आहे. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील दैनदिन कामावर सुध्दा परिणाम झाला होता.
हवामान विभागाने पुढील दोन आठवडे तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज जिल्ह्यात काही प्रमाणात खरा होत असल्याचे चित्र आहे. मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या वर असल्याने जिल्ह्यावासीयांची चांगलीच होरपळ आहे. जणू सूर्य देवाने गोंदिया जिल्ह्यात मुक्काम ठोकला की असे चित्र होते. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. एप्रिल महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक ४३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर तापमानात घट झाली होती. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला होता. मात्र मागील तीन चार दिवसांपासून पारा चढण्यास सुरूवात झाली आहे. त्यानंतर आज शनिवारला (दि.25) या हंगामातील सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.हे तापमान आजरवचे सर्वाधिक तापमान असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यातच आजपासून नवतपा सुरु झाल्याने अजून एक आठवडा तापमान वाढम्याची शक्यता नाकारता येत नाही.