बेघरांकरिता पालिका करणार १०० खाटांची व्यवस्था

0
19

शहरातील बेघर लोकांचे सर्वेक्षण सुरू

गोंदिया : गोंदिया नगर पालिकेंतर्गत ज्या लोकांचे स्वत:चे घर नाही. जे रेल्वे स्थानक, बस स्थानक, रस्त्याच्या कडेला, उड्डाणपुलाच्या खाली राहतात, अशांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्याकरिता विमेक्स ई सोल्यूशन इंडिया प्रा. लि. या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. ३ जून पासून हे सर्वेक्षण सुरू झाले असून सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण ३ जणांचे पथक करणार असून त्यांच्यासह पोलिस सुरक्षा देखील आहे. हे स‌र्वेक्षण रात्री ८ ते १२ वाजता दरम्यान करण्यात येत आहे. बेघर लोकांच्या सर्वेक्षणाची सुरुवात धोटे सुतीका गृह येथून करण्यात आली.

उद्घाटन कार्यक्रमाला नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे, सभापती सचीन शेंडे, अमृत इंगळे, राजा कदम, सहायक प्रकल्प अधिकारी सुनंदा बिसेन, व्यवस्थापक धनराज बनकर, तथागत क्रिडा मंडळाचे मोहसीन नागदवने यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक धनराज बनकर यांनी मांडले. यावेळी अध्यक्ष अशोक इंगळे म्हणाले, शहरी बेघर लोकांकरिता दिनदयाल अंत्योदय योजना अत्यंत चांगली असून त्याचा लाभ बेघर लोकांना होणार आहे. बेघरांना नगर पालिकेमार्फत हक्काचे छत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्वेक्षणात आढळणाऱ्या बेघरांच्या व्यवस्थेकरिता १०० खाटांचे बेघर निवास तयार करण्यात येणार असून त्याकरिता सहकार्याची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. संचालन आणि आभार सुनंदा बिसेन यांनी केले. यशस्वितेकरिता हेमंत मेश्राम, काळजी वाहक रविंद्र बोरकर, पूर्णप्रकाश कुथेकर, राजेंद्र लिल्हारे यांनी परिश्रम घेतले.