तंबाखूजन्य पदार्थ सेवन केल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होतो- डॉ.कविता मदान

0
79

  गोंदिया : भारत हा तंबाखू उत्पादनामध्ये व तंबाखू सेवन करण्यामध्ये जगात दुसऱ्या क्रमांवर आहे. तंबाखू पदार्थात जवळ जवळ 4000 हानिकारक व कर्करोगास कारणीभूत असणारे रसायने असतात, जी शरीराला अत्यंत हानिकारक असतात. तंबाखूत असलेला  निकोटीन हा घटक पदार्थ अत्यंत विषारी समजला जातो, जो मानवी शरीराला उत्तेजीत करतो. अमेरीकेत झालेल्या एका सामाजिक संस्थेच्या अहवालानुसार तंबाखूच्या वापरामुळे शरीरातील जवळपास सर्व अवयवांवर घातक परिणाम होवून विविध आजार होतात व त्यामुळे संपूर्ण आरोग्य धोक्यात येते. जगात दरवर्षी जवळपास 50 लक्ष लोकांचा व भारतात 10 लक्ष वार्षिक मृत्यू हा तंबाखू सेवनाने होतो. असे मत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहायक प्राध्यापिका डॉ.कविता मदान यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे प्रभारी सचिव एन.आर.वानखडे, समाजसेविका सविता बेदरकर व केटीएस रुग्णालयाचे जिल्हा सल्लागार डॉ.शैलेश कुकडे उपस्थित होते.

 प्रास्ताविकातून श्री.वानखडे म्हणाले, राष्ट्रीय विधीक सेवा प्राधिकरण कायदा 1987 नुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुका विधी सेवा समिती अंतर्गत विधी सहाय्य विषयक माहिती गरजू व्यक्तींना मोफत पुरविली जाते. या कायदयाअंतर्गत विविध कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम व इतर राष्ट्रीय लोकअदालतसारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. कार्यक्रमाच्या दृष्टीने समाजामध्ये कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाअंतर्गत आयोजित केले जातात असे त्यांनी सांगितले.

डॉ.कुकडे म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी म्हणजे अशी ठिकाणे जिथे सर्वसामान्य व्यक्ती प्रवेश करु शकतात. अशा ठिकाणी प्रतिबंध विविध कायदयाची तोंडओळख माहिती सांगितली आहे. या कायदयाचे उल्लंघन केल्यास व्यक्तीस 200 रुपये पर्यंत दंड आकारण्याची तरतुद कायदयात आहे. तसेच 18 वर्षाखालील व्यक्तीस तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे हा दंडनीय अपराध समजला जातो असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास जिल्हा न्यायालयीन कर्मचारी, वकील वर्ग तसेच पॅरा लिगल व्हालंटीअर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जी.सी.ठवकर, पी.एन.गजभिये, एस.एम.कठाणे, एल.पी.पारधी व एस.एस.पारधी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन ॲड.शबाना अंसारी यांनी केले तर उपस्थितांचे आभार ॲड.एम.पी.चतुर्वेदी यांनी मानले.

00000