ताडोबात वणवा; लाखोंची वनसंपदा स्वाहा

0
12

चंद्रपूर,दि. ४–ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये शुक्रवारी लागलेली आग अजूनही धुमसत आहे. पद्मापूर गेटच्या उजव्या बाजूला असलेल्या जंगलाला आगीने आपल्या कवेत घेतले. शनिवारी सकाळच्या सुमारास आग सुरूच होती. या आगीत लाखोंची वनसंपदा स्वाहा झाली. मात्र, वनाधिकारी रात्री ३ वाजताच आग विझविण्यात आल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत.
शुक्रवारी संध्याकाळी लागलेली आग काही वन्यजीवप्रेमींच्या लक्षात आली. त्यांनी लगेच याबाबतची माहिती वनविभागाला दिली. मात्र, बराच कालावधी लोटूनही वनविभागाचा एकही कर्मचारी या आगीकडे फिरकला नाही. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे या आगीने जंगलाचा बराच भाग आपल्या कवेत घेतला असून, यात लाखो रुपयांची वनसंपदा जळून खाक झाली आहे. यासोबतच छोटी-मोठी झाडे, गवत-पालापाचोळा आणि पक्ष्यांची आश्रयस्थळे भस्मसात झाली असून, इको-सिस्टीमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
येत्या काही दिवसात जिल्ह्यात मोहफुल गोळा करण्याचा हंगाम सुरू होणार आहे. मोहफुल गोळा करणे सोपे जावे, यासाठी स्थानिक लोकांकडून अशा प्रकारच्या आगी लावल्या जातात. अशाच प्रकारे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.