उन्हाळी हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे चुकारे त्वरित द्या

0
14

सडक अर्जुनी ,दि.13: जिल्ह्यात धान पिकाचे उत्पादन खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाते. त्यातच सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव या दोन तालुक्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकरी धान पिकांची लागवड करतात. शेतकऱ्यांसाठी धानाची खरेदी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरून केली जाते. धान खरेदीला सुरुवात होऊन महिनाभऱ्याचा कालावधी लोटला असून अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. तसेच धान खरेदीची मुदत ३० जुलैपर्यंत वाढविण्यात यावी, या प्रमुख मागण्यांना घेऊन तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सडक अर्जुनीचे तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे..

तालुक्यामध्ये रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. मात्र शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करून महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला असूनसुद्धा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली नाही. आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची मोजणी ही अतिशय कमी प्रमाणात असून धान खरेदीसाठी ३० जून २०१९ ही तारीख दिली असली तरी तालुक्यातील शेतकऱ्यांची धानाची मोजणी या कालावधीत होणे शक्य नाही. त्यामुळे धान मोजणीसाठी ३० जुलै असा कालावधी देण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहरराव चंद्रिकापुरे, जि.प. गटनेते गंगाधर परशुरामकर, जि.प.सदस्य रमेश चुऱ्हे, नगराध्यक्ष देवचंद तरोणे, तालुकाध्यक्ष डॉ. अविनाश काशीवार, तालुका महिला अध्यक्ष रजनी गिऱ्हेपुंजे, माजी जि.प. उपाध्यक्ष छाया चव्हाण, पं.स.सदस्य मंजू डोंगरवार, सरपंच दिनेश कोरे, एफ.आर. शाह, उमराव मांढरे, केदार चव्हाण, प्रमोद गिऱ्हेपुंजे, घनश्याम काशिवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते. .