पालिका ते चांदनी चौक रस्त्याचे भूमीपूजन

0
18

गोंदिया,दि.२२ः : शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असलेल्या नगर पालिका ते चांदनी चौक या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. याठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व्यापाऱ्यांनी अर्धा रस्ता देखील व्यापून टाकला होता. त्यावर उपाय म्हणून नगर पालिकेने ही बाब अत्यंत गंभीरतेने घेत नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांनी याकडे विशेष लक्ष देत या रस्ता बांधकामाला तातडीने मंजुरी प्रदान केली. या मार्गाकरिता ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. निविदा प्रक्रीया पूर्ण करून शुक्रवारी नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांच्या हस्ते या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. या रस्ता बांधकामामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुला असलेले अतिक्रमण देखील हटणार आहे. शिवाय नागरिकांना ये-जा करण्याकरिता दर्जेदार रस्ता उपलब्ध होणार आहे. कंत्राटदाराने दर्जेदार आणि तातडीने बांधकाम करावे, असे निर्देश अध्यक्ष अशोक इंगळे यांनी यावेळी दिले. यावेळी पालिकेचे बांधकाम सभापती बेबी अग्रवाल, शकील मन्सूरी, राकेश ठाकूर, अमीत बिरीया,  दिपम देशमुख, अमृत इंगळे आदींची उपस्थिती होती.