सामाजिक न्याय दिनानिमीत्त सामाजिक न्याय भवनात कार्यक्रम

0
17

गोंदिया: दि.२४. : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस २६ जून हा दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून २६ जून रोजी सकाळी ११.३० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,गोंदिया येथे समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींचे शासकीय वसतीगृहांचे गृहपाल, विविध कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तथा प्रशिक्षणार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, विविध महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
सामाजिक न्याय दिनानिमीत्त २६ जून रोजी सकाळी ९ वाजता इंदिरा गांधी स्टेडियम-नेहरु चौक, गोरेलाल चौक, शहर पोलीस स्टेशन मार्गे गांधी चौक, जयस्तंभ चौक ते दिंडी विसर्जन आंबेडकर चौकपर्यंत समता दिंडी व व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावरील कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेअंतर्गत धनादेश वाटप, बचत गटाच्या लाभार्थ्यांना मिनी टॅक्टर वाटप, सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात निवासी शाळेतील इयत्ता दहावीतील प्रथम व द्वितीय आलेल्या व वसतिगृहातील बारावीच्या प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थी/विद्यार्थीनींचा सत्कार, विमुक्त जाती भटक्या जमाती माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक न्याय दिनानिमीत्त २६ जून ते २५ जुलै २०१९ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. असे सहायक आयुक्त, समाज कल्याण, गोंदिया यांनी कळविले आहे.