जिल्ह्यात वणव्यामुळे ४४० हेक्टर जंगल प्रभावित

0
22

गोंदिया,दि.26 : जंगलात लागणाऱ्या वणव्यामुळे होणाऱ्या नुकसानीला आळा घालता यावा यासाठी वनविभागाकडून दरवर्षी नियोजन करण्यात येत असताना वणव्यावर नियंत्रण ठेवण्यात वन विभाग कमी पडत असल्याचे चित्र आहे. विविध कारणांनी जंगल परिसरात आगीच्या घटना घडत असतात. यंदाही जिल्ह्यातील जंगलांमध्ये वणव्याच्या घटना घडल्या असून ४४०.०८ हेक्टर वन परिसर प्रभावित झाला आहे. वन विभागाकडून ३२० घटनांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. .

दरवर्षी विविध कारणांनी जंगलात आग लागते. यामध्ये कोट्यवधी रुपयांची वनस्पती जळून खाक होते. त्याचबरोबर वन्यप्राण्यांनाही प्राण गमवावे लागतात. याकरिता वनविभागातर्फे उपाययोजना राबविण्यात येतात. वणव्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्याचे कार्यही वनविभागातर्फे करण्यात येते. नागरिकांमध्ये वनांविषयी आपुलकी निर्माण व्हावी, वनांचे महत्त्व कळावे, याकरिता जनजागृती करण्याबरोबरच सॅटेलाईटच्या मदतीने वणवाव्याप्त भागावर पाळत ठेवून फायर वॉचर्स पथकाची नेमणूक करून फायर ब्लोअर मशीनच्या मदतीने वणव्यावर नियंत्रण ठेवले जाते. असे असले तरी दरवर्षी वणव्याच्या घटनांची नोंद केली जाते. जिल्ह्यात गोंदिया, गोरेगाव, सडक अर्जुनी, अर्जुनी मोर, आमगाव, सालेकसा, तिरोडा, देवरी दक्षिण, देवरी उत्तर, गोठणगाव, नवेगावबांध, चिचगड असे एकूण १२ वनक्षेत्र व डेपो डोंगरगाव, डेपो नवेगावबांध या अंतर्गत १ लाख ७३ हजार हेक्टर क्षेत्रफळ वन विभागाच्या अखत्यारित आहे. यातील काही भाग अतिसंवेदनशील क्षेत्रात मोडतो. तर दरवर्षी जिल्ह्यात वणव्याच्या घटनात वाढ होत असल्याचे चित्र असल्याने यावर आळा घालता यावा यासाठी केंद्र शासनातर्फे एका संस्थेमार्फत मागील पाच वर्षांपासून संपूर्ण वणव्याप्त भागावर उपग्रहाद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. तर वर्ष २०१४ पासून जिल्ह्यात फायर वॉचर्सची निवड करून नियमित गस्त ठेवून प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. .

दरम्यान, यंदा १२ रेंज व दोन डेपो मिळून फायर वॉचर्स पथकही नेमण्यात आले होते. यात एका पथकात पाच कर्मचारी व स्थानिक मजुरांची निवड करण्यात आली होती. तर त्यांच्या मदतीला वनविभागाचे वनरक्षक, वनमजुरांना देखील या कामी लावण्यात आले होते. विशेष म्हणजे, शासनाकडून विभागाला फायर ब्लोअर मशिन व फायर ब्लोअर इंजिनही पुरविण्यात येत असून यंदा गोंदिया वन विभागाकडे २५५ फायर ब्लोअर मशिन उपलब्ध झाल्या असल्याची माहिती आहे. असे असतानाही अनेक कारणांनी जंगलात आग लागत असते. वन विभागाकडून करण्यात आलेल्या नोंदीनुसार यंदाच्या फेब्रुवारी ते मे या चार महिन्यात ३२० वणव्याच्या घटनांची नोंद करण्यात आली असून यात ४४०.०८ हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी २४१ वणव्याच्या घटनांची नोंद करण्यात आली होती. ज्यामध्ये यंदा वाढ आहे. मात्र, प्रभावित क्षेत्र पाहता गतवर्षी जानेवारी ते जून या कालावधीत ६८६.०७६ हेक्टर वनक्षेत्र प्रभावित झाले असल्याची नोंद आहे.