ग्राहकांच्या तक्रारींचा महावितरणने तातडीने निपटारा करावा-जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

0
9
  • जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सभा

वाशिम, दि. २६ : महावितरणच्या संदर्भात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद व लोकशाही दिनात दाखल होणाऱ्या तक्रारी अधिक आहेत. महावितरणच्या स्तरावर ग्राहक तक्रार निवारणासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. या यंत्रणेकडे दाखल होणाऱ्या तक्रारींची दखल तातडीने घेवून त्याचा निपटारा लवकरात लवकर करण्यासाठी महावितरणने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सभेत दिल्या.यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा परिषदेचे सदस्य सचिव देवराव वानखेडे, वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले यांच्यासह शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, वीज बिलातील चूक, चुकीची वीज बिल आकारणी, मीटर नादुरुस्त असणे, रीडिंग न घेता वीज बिल आकारणी अशा स्वरूपाच्या तक्रारी सातत्याने दाखल होतात. या तक्रारी निकाली काढण्यासाठी महावितरणने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी. तसेच ग्राहक तक्रार निवारणासाठी सुरु करण्यात आलेल्या मोबाईल अॅप्लिकेशनबाबत अधिकाधिक जनजागृती करावी. या अॅप्लिकेशनवर दाखल होणाऱ्या तक्रारींचा निपटारा तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

भ्रमणध्वनी सेवा पुरविणाऱ्या काही कंपन्या शहरी भागामध्ये अनधिकृतपणे टॉवर्सची उभारणी करीत असल्याच्या तक्रारी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेकडे प्राप्त झाल्या आहेत. याबाबत सर्व नगरपरिषदांनी आवश्यक तपासणी करून विना परवानगी उभारण्यात आलेल्या टॉवर प्रकरणी कारवाई करावी, असेही जिल्हाधिकारी श्री. मोडक यावेळी म्हणाले. नगरपरिषद क्षेत्रातील बांधकाम परवानगीसाठी केलेल्या अर्जांवर विहित कालावधीत कार्यवाही होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा काही अशासकीय सदस्यांनी उपस्थित केला. यावेळी जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर त्यावर कार्यवाही करून संबंधित अर्जदाराला परवानगी देणे अथवा नाकारणे याविषयीचा निर्णय विहित कालावधीत घेणे आवश्यक आहे. याबाबत सर्व नगरपरिषद क्षेत्रातील अर्जांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात येईल.

शहरी भागात सुरु असलेल्या खाजगी कोचिंग क्लासेसच्या इमारतींचे फायर ऑडीट करण्यात यावे, अशी मागणी यावेळी काही अशासकीय सदस्यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी सर्व नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी आपापल्या शहरात सुरु असलेल्या कोचिंग क्लासेसची माहिती संकलित करून हे क्लासेस सुरु असलेल्या इमारतींचे फायर ऑडीत झाले आहे किंवा नाही, याची माहिती घेण्याच्या सूचना दिल्या.