सामुहिक विवाह सोहळ्यातील नवदाम्पंत्यांना पाहुण्यांच्या हस्ते भेट वस्तू

0
21

गोंदिया दि.२६.: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती समाज कल्याण विभाग कार्यालय व पहांदीपारी कुपार लिंगो बहुउद्देशीय संस्था खर्रा ता.जि.गोंदिया यांच्या संयुक्त वतीने आज २६ जून रोजी सामाजिक न्याय दिन म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन गोंदिया येथे साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले. अध्यक्षस्थानी जि.प.समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे होते. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक विनीता साहू, जि.प.उपाध्यक्ष अलताब हमीद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.हाश्मी, समाज कल्याणचे सहायक आयुक्त डॉ.मंगेश वानखडे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, सेवानिवृत्त जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती.
आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यात १९ जोडपी विवाहबध्द झाली. यावेळी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दोन बचतगटातील लाभार्थ्यांना मिनी ट्रॅक्टर वाटप, दिव्यांग व्यक्तींना स्वयंचलीत तीनचाकी सायकल, आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना प्रती ५० हजार रुपये याप्रमाणे अर्थसहाय्याचे धनादेश वितरीत करण्यात आले. सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात निवासी शाळेतील इयत्ता दहावीतील प्रथम व द्वितीय आलेल्या व वसतिगृहातील बारावीच्या प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थी/विद्यार्थीनींचा तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून याप्रसंगी सामुहिक विवाह सोहळ्यात विवाहबध्द झालेल्या १९ जोडप्यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी नवदाम्पंत्यांना शुभाशिर्वाद देवून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नवदाम्पंत्यांना मान्यवरांच्या हस्ते मंगळसुत्र, साडीचोळी, शर्टपॅन्ट व संसारोपयोगी घरगुती भांडी भेट वस्तू प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रदिप ढवळे यांनी केले. उपस्थितांचे आभार वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक अंकेश केदार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मण खेडकर, विशाल कळमकर, विनायक जटाळे, श्रीमती विद्या मोहोड, सतीश वाघ, शैलेश उजवणे, योगेश हजारे, मनोहर सोनटक्के, विलास रामटेके, राजेश मेश्राम, दिपक टेकाडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास समाज कल्याण विभागातील अधिकारी-कर्मचारी, विविध महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी तसेच नवदाम्पंत्यांना शुभाशिर्वाद देण्यासाठी त्यांचे नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.