आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना;लाभार्थ्यांनी ई-कार्ड तयार करुन घेण्याचे आवाहन

0
14

वाशिम, दि. २६ : केंद्र सरकारने आयुष्मान भारत- राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा अभियानांतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेस २१ मार्च २०१८ रोजी मान्यता दिली असून या योजनेंतर्गत लाभार्थी कुटूंबांना प्रती कुटूंब प्रतीवर्ष ५ लाख रुपयांपर्यंत देशभरातील मान्यता प्राप्त रुग्णालयामधून शस्त्रक्रिया व उपचाराच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे. सामाजिक आर्थिक जातीय जणगणनेनुसार वाशिम जिल्ह्यातील १ लक्ष ३५ हजार ५५३ कुटुंबे या योजनेसाठी पात्र असून यामध्ये शहरी भागातील १९ हजार ४५१ व ग्रामीण भागातील १ लक्ष १६ हजार १०२ कुटुंबांचा समावेश आहे. पात्र लाभार्थी कुटुंबांचे ई-कार्ड बनविण्याचे व रुग्णांना योजनेंतर्गत लाभ देण्याचे काम सुरु झाले असून पात्र लाभार्थ्यांनी स्वत:चे ई-कार्ड बनवून योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील घराची भौगोलिक स्थिती, कुटुंबातील कमावती व्यक्ती, अनुसूचित जाती व जमाती, भूमिहीन शेतकरी आदी सात वर्गातील कुटुंबांचा तसेच शहरी भागातील कचरा वेचक, भिकारी, घरकाम करणारे, फेरीवाले, बांधकाम मजूर कारागीर आदी ११ वर्गातील कुटुंबांचा समावेश प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत आहे. लाभार्थी कुटुंबांना प्रतिवर्ष ५ लक्ष रुपयांपर्यंतचे ११२२ सर्जिकल आणि मेडिकल उपचार मान्यताप्राप्त खाजगी आणि शासकीय रुग्णालयांमार्फत उपलब्ध होणार आहेत. योजनेचा प्रचार, प्रसार करण्यासाठी माननीय प्रधानमंत्री यांचे पत्र आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत घरपोच पाठविण्यात आले आहे. अशा लाभार्थींना तसेच २०११ च्या सामाजिक आणि आर्थिक जनगणनेनुसार सर्वे झाला आहे, अशी लाभार्थी कुटुंबे यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार असून या कुटुंबांनी स्वतःचे ई-कार्ड तयार करणे आवश्यक आहे.

पात्र लाभार्थी कुटुंबांचे ई-कार्ड तयार करण्यासाठी शिधापत्रिका, माननीय प्रधानमंत्री प्रधानमंत्री यांचे स्वाक्षरीचे वितरीत करण्यात आलेले पत्र आणि स्वतःचे ओळखपत्र (आधारकार्ड) सोबत आणणे आवश्यक आहे. नजीकच्या कॉमन सर्विस सेंटर अथवा योजनेच्या अंगीकृत रुग्णालयात आरोग्य मित्रांना भेटून हे ई-कार्ड तयार करून घेता येणार आहे.