जनहित सामाजिक सेवाभावी संस्थेच्यावतीने गुणवंत विद्यार्थांचा सत्कार

0
21

भंडारा,दि.27ः- येथील जनहित सामाजिक संस्थेच्यावतीने भंडारा जिल्ह्यातून सीबीएसई व राज्य परिक्षा मंडळाच्या परिक्षेत प्रथम,व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार येथील साई मंगल कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात करण्यात आला.कार्यक्रमाचे उदघाटक जि.प.अध्यक्ष रमेश डोंगरे होते तर अध्यक्षस्थानी जनहित सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार आनंदराव वंजारी होते.प्रमुख अतिथी डॉ. माधवराव मस्के,संस्थेचे पदाधिकारी के.एन नान्हे, अर्जुन सुर्यवंशी,  दामोदर शिरसागर, वासुदेव नेवारे, प्रविण भोंदे, अभिजीत वंजारी, प्रेमलाल लांजेवार, जाधवराव साठवने,  प्रकाश थानथराठे,  रमेश भद्रे, सदाशिव बानेवार, रमेश व्यवहारे, भाऊराव येळणे,   प्रेमराज मोहकर, तुलसीराम गेडाम प्रिया बानेवार, अनिता बोरकर, मंजुषा बुरडे  आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करतांना गरिबानो लाजू नका, श्रीमंताने माजू नका शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे जास्त भर द्यायला पाहिजे कारण मी चार वर्षाचा असताना माझे वडील  मरण पावले.तेव्हा आमची परिस्थिती हालाखीची होती अश्या वेळी माझ्या आईने काबाडकष्ट करून आमचे शिक्षण पुर्ण केले. आम्हाला सुसंस्कारी बनवून योग्य ती दिशा दाखवली म्हणून आई ही आईच असते.आई-वडील आपली काळजी करतात त्याचप्रमाणे आपण सुद्धा आई-वडिलांची काळजी करून त्यांचा आदर करायला पाहिजे असे विचार व्यक्त केले.  माजी आमदार आनंदराव वंजारी यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यात उच्च शिक्षण घेऊन जिल्ह्याचे नाव लौकिक केले. परंतु महाराष्ट्रातील स्थानिक विद्यार्थींना मराठी भाषेचा विसर पडल्यासारखा झाल्याची खंत व्यक्त करीत मराठी भाषा आपली मायबोली असल्याने त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हणाले. मराठी भाषेचा आदर करायला पाहिजे आम्ही संस्थेच्या माध्यमांमधून विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्यात त्यांना चांगले स्थान मिळावे याकरिता विविध कार्यक्रम राबवित असल्याचे सांगितले.
यावेळी सीबीएससी बोर्डातून 12 वीत जिल्ह्यांत प्रथम आलेला विद्यार्थी अक्षय राजकुमार जैन,व्दितीय क्रमांक पटकावणारी साक्षी आनंद सेलोटे,इयत्ता 10 वीत प्रथम आलेला विद्यार्थी यश विकास कुंभारे,द्वितीय क्रमांकाने आलेली विद्यार्थिनी श्रेया खेमचंद निखाडे,मानसी जगदीश ब्राह्मणकर,दक्षिण रामस्वरूप धूत, राज्य परिक्षा बोर्डात जिल्ह्यात प्रथम आलेली विद्यार्थींनी खुशी संतोष गंगवानी, द्वितीय क्रमांक चिन्मय अनिल नवलाखे,त्याचप्रमाणे एचएससीत प्रथम वैष्णवी विजय हिंगे,प्रतीक्षा प्रमोद बेलपुरिया,द्वितीय क्रमांक शिवानी रामभाऊ कांबळे,मिताली देशपांडे,सुरभी रामभाऊ गेडाम यांचा स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. संचालन प्रेमलाल लांजेवार यांनी केले व आभार प्रदर्शन अर्जुन सूर्यवंशी यांनी मानले.