इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेमार्फत नागरिकांसाठी विविध सुविधा

0
14
  • भारतीय डाक विभागाचा उपक्रम

वाशिम, दि. २७ : भारतीय डाक विभागामार्फत इंडिया पोस्ट पेमेंटस बँक (आयपीपीबी) सुरु करण्यात आली आहे. या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली.इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेमार्फत सामान्य बचत खाते, चालू खाते, विविध प्रकारच्या अनुदानाची रक्कम ग्राहकांच्या खात्यामध्ये जमा करणे (डीबीटी पेमेंट), फंड ट्रान्स्फर (आयएमपीएस, युपीआय, एनईएफटी, आरटीजीएस), वेतन खाते, विविध बिल, देयके यांचे भुगतान, प्रधानमंत्री मातृ वंदन आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, विमा, बचत योजना, मर्चंट बँकिंग, एस.एम.एस. सुविधा पुरविण्यात येते. वाशिम जिल्ह्यात एक मुख्य शाखा व १६४ सुविधा केंद्रांद्वारे ह्या सर्व बँक, पोस्ट ऑफिसमार्फत नागरिकांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत.

नागरिकांनी इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेत आपले बचत खाते, प्रधानमंत्री मातृ वंदन योजना व प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे खाते सुरु करून विविध सुविधांचा लाभ घ्यावा. खाते सुरु करण्यासाठी खातेदारास केवळ आधार कार्ड व मोबाईल असणे आवश्यक आहे. खाते सुरु करण्याच्या प्रक्रियेत मोबाईलवर ओटीपी प्राप्त होतो. खाते सुरु झाल्यानंतर ते खाते आयपीपीबी मोबाईल बँकिंग अॅपवर चालविता येते. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी भारतीय डाक विभागामार्फत इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेत खाते उघडून त्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.