१ जुलैला कृषि दिनानिमित्त विविध कार्यक्रम;शेतमाऊली सन्मान सोहळा

0
16

वाशिम, दि. २७ : जिल्हा परिषद कृषि विभाग व राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत १ जुलै २०१९ रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषि साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे दुपारी १ वाजता खरीप हंगामातील पिकांच्या नियोजनाबाबत चर्चासत्र, शेतमाऊली सन्मान सोहळा व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार असून केंद्रीय मनुष्यबळ विकास, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

ऊर्जा, पर्यटन, अन्न व औषध प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, सामान्य प्रशासन राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे सहपालकमंत्री मदन येरावार,  गृह, विधी व न्याय, संसदीय कार्य, कौशल्य विकास व उद्योजकता, माजी सैनिकांचे कल्याण राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, राज्य शिक्षण सल्लागार परिषदेचे उपाध्यक्ष श्रीकांत देशपांडे, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार लखन मलिक, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती चंद्रकांत ठाकरे, कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती विश्वनाथ सानप, समाज कल्याण समिती सभापती पानुताई जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती यमुनाबाई जाधव, आरोग्य व शिक्षण समिती सभापती सुधीर गोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास तापी यांची उपस्थिती राहणार आहे.

कृषि दिनाचे औचित्य साधून खरीप हंगामातील पिकांच्या नियोजनाबाबत आयोजित चर्चासत्रात डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कृषि संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विकास गौड, करडा येथील कृषि विज्ञान केंद्राचे विषयतज्ज्ञ आर. एस. डवरे हे मार्गदर्शन करतील. तसेच जिल्ह्यातील धैर्य व सामर्थ्याने संसाराचा गाडा पेलणाऱ्या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील माता-भगिनींचा सन्मान ‘शेतमाऊली सन्मान सोहळा’ अंतर्गत आयोजित करण्यात आला आहे. तरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी बहुसंख्येने या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.