बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी अंगणवाडीची भूमिका महत्वाची- डॉ. अमित सैनी

0
38

बाल आरोग्य अभियानाचे उद्घाटन

गोंदिया, दि.७ : बालकांना प्राथमिक स्तरावर करण्यात येणारे लसीकरण, देण्यात येणारा पोषण आहार आणि इतर आरोग्यविषयक सुविधेमुळे बालके निरोगी व निरामय आयुष्य जगू शकता. बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी अंगणवाडीची भूमिका महत्वाची आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले.
आज (ता.७) केटिएस जिल्हा सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत ७ ते ३० एप्रिल दरम्यान राबविण्यात येणाऱ्या बाल आरोग्य अभियानाचे उद्घाटक म्हणून डॉ. सैनी बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीष कळमकर, वरिष्ठ शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र जैन, बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजीव दोडके, बाल आरोग्य अभियानाचे संयोजक डॉ. सुरेश लाटणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघमारे, आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ. तूरकर उपस्थित होते.
डॉ. सैनी पुढे म्हणाले, बाल आरोग्य अभियान हे फक्त आरोग्य विभागापुरते मर्यादित नसून महिला व बाल कल्याण विभागाने आपले महत्वपूर्ण योगदान द्यावे. शहरी व ग्रामीण भागातील बालकांच्या आरोग्यविषयक समस्यांचे स्वरुप बदलले आहे. बालकांमध्ये कुपोषणाप्रमाणे अतिपोषणाची समस्याही भेडसावत आहे. अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता आरोग्य विभागाने सामाजिक सेवा संस्थांनादेखील सहभागी करुन घ्यावे. बालकांची आरोग्य विषयक अचूक नोंदणी करण्याचे यावेळी सांगितले.
१२ ते १५ वर्ष वयोगटातील बालकांतील अतिताणाचे प्रमाण बघता शाळा व महाविद्यालय स्तरावर समस्या निराकरण कार्यशाळेचे आयोजन करावे, असेही त्यांनी सुचविले. जिल्हयातील २५०-३०० बालके गंभीर आजारी असून या अभियानाअंतर्गत त्यांच्यावर उपचार करण्यात यावे असे सांगितले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवि धकाते यांनी बाल आरोग्य अभियानाचे महत्व विषद केले. गोंदियासारख्या आदिवासी व नक्षलग्रस्त भागात आरोग्यविषयक जनजागृतीचा अभाव आढळतो. परंतु अशा अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीतून नागरिकांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती होत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. कळमकर म्हणाले, या अभियानाअंतर्गत ० ते १८ वर्षापर्यंत बालकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात येईल. या अभियानामध्ये लसीकरण, ओआरएसचे महत्व, विटामिन ए च्या डोजचे महत्व इतर आरोग्यविषयक बाबी व सर्व आजांरावर उपचार करण्यात येईल.
डॉ. तुरकर म्हणाले, १० ते १२ वर्षावरील बालकांचे पण बालरोगतज्ञाकडून आरोग्य तपासणी करणे महत्वाचे आहे. बदलत्या जीवनशैलीचा बालकांवर मोठया प्रमाणात परिणाम होतो. तेव्हा त्यांच्यावर योग्य ते उपचार होणे गरजेचे आहे.
डॉ. संजीव दोडके यांनी, बालके अतिशय संवेदनक्षम असतात. विविध आजारापासून बचाव करण्याकरीता या अभियानात प्रयत्न करण्यात येईल. असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुरेश लाटणे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. सुवर्णा हूबेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. दूधे यांनी मानले. कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती व डॉ. बाहेकर नर्सिंग विद्यालयाच्या विद्यार्थिनी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.