मुख्य प्रवाहाशी जुळल्यास लोकांचा विकास शक्य-आटोळे

0
9

सालेकसा,दि.०८ : : सुदूर ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांनी शासनतर्फे राबविण्यात येणाºया विविध योजनांचा लाभ घेतल्यास त्यांना मुख्य प्रवाहात आणणे शक्य असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांनी केले.सालेकसा तालुक्यातील मुरकुटडोह येथे गुरूवारी साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता शाहू यांच्या मार्गदर्शनात मुरकुटडोह दंडारी परिसरातील गरजू नागरिक व विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.
या वेळी प्रामुख्याने आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालींदर नालकूल, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव, प्रशांत पवार, पार्टी कमांडर संदीप चव्हाण व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. आटोळे म्हणाले, शासनाच्या वतीने पोलीस प्रशासन सर्वसामान्य जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. लोकांच्या अडीअडचणी समजून वेळोवेळी आवश्यक ती मदत करण्यासाठी तत्पर असते. लोकांनी सुध्दा चांगले आणि वाईट यातील फरक समजून प्रगतीच्या वाटेवर जाण्यासाठी पुढे जाण्याची गरज असल्याचे सांगितले.
याप्रसंगी मुरकुटडोह १,२,३ आणि दंडारी १,२ व टेकाटोला येथील गरजू विद्यार्थ्याना वह्या, पुस्तके, पेन, पेन्सील, छत्र्या, मिठाई आदी साहित्य वाटप करण्यात आले. तसेच गावातील गरजू वृध्द लोकांसह विधवा महिलांना छत्र्या, नमकीन, पाकीट, मिठाई आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधून पोलिसांनी गावकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या व त्या दूर करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमात जवळपास २०० लोकांनी सहभाग नोंदविला होता. कार्यक्रमाचे संचालन व आभार सालेकसा पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजकुमार डुणगे यांनी केले. कार्यक्रमासाठी यशस्वीतेसाठी सालेकसा पोलीस स्टेशन आणि दूरशसस्त्र क्षेत्र दरेकसा येथील पुरुष व महिला पोलीस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.