हप्त्याविना रखडले लाभार्थ्यांच्या घरकुलाचे बांधकाम

0
13

गोरेगाव, दि.०९: येथील नगर पंचायतीच्या वतीने शहरातील गरजू लाभार्थ्यांना घरकूल योजनेच्या माध्यमातून २0१८ ला ३६७ लाभार्थी व २0१९ या वर्षात १९0 लाभार्थ्यांना घरकूलाचा लाभ दिला आहे. त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दुसरा हप्ता जमा करण्यात आला नाही. त्यामुळे घरकुलाचे बांधकाम अर्धवट झाले असून, लाभार्थ्यांना पावसाळ्यात आसरा घेण्यासाठी टिनपत्रे टाकून झोपडी तयार करावी लागली आहे.
नगर पंचायतीने पंतप्रधान घरकूल बांधकामाकरिता पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ४0 हजार रुपये जमा केला. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपले जुने राहते घर पाडून नवीन बांधकामास सुरुवात केली. परंतु, नगर पंचायतीकडून दुसरा हप्ता लाभार्थ्यांना देण्यात आला नाही. अनेकदांनी कर्ज काढून घरकूल बांधकाम करण्याचा प्रयत्न केला. पण ते बांधकाम करता आले नाही. शहरात २0१८ ला ३६७ घरकूल मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी २५0 लाभार्थ्यांना पहिला हप्ता ४0 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. त्यानुसार, नवीन बांधकामास सुरुवात केली आहे. परंतु दुसरा हप्त्याच्या प्रतिक्षेत पावसाळा सुरु झाला असून बांधकाम अर्धवट पडले आहे. शहरात मोठय़ा प्रमाणात विकास कामांच्या नावावर रस्ते, सिमेंट नाली बांधकाम सुरु आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी प्रत्येक प्रभागात जमा होत असून नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास होत आहे. दुसरीकडे घरकूल लाभार्थ्यांना राहण्यायोग्य घरकूल बांधकाम करता आले नसल्याने तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही लाभार्थ्यांनी सुविधाजनक जागेवर टिनाचा उपयोग करुन झोपडी तयार केली आहे. तेथे कुटुंबातील सदस्यांना आसरा देत आहेत.
यासंदर्भात नगराध्यक्ष आशिष बारेवार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शहरी घरकूल लाभार्थ्यांना बांधकामाचा दुसरा हप्ता बँक खात्यात शासनाने जमा केला नाही. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. परंतु घरकूल लाभार्थ्यांना अतिरिक्त फंडातून रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याचे त्यांनी सांगितले.