कीटकनाशक फवारणी करताना काळजी घ्या

0
20

वाशिम, दि. 10 : गेल्या काही दिवसांत किटकनाशकांच्या फवारणीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याच्या प्रकरणांची माहिती विविध माध्यमांमधून समोर आली आहे. ही प्रकरणे किटकनाशकांच्या वापराशी संबंधीत आहेत अथवा नाही, याची शहनिशा करण्याचे काम कृषि विभागातर्फे सुरु आहे. जिल्हा प्रशासन बाधित शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना सर्वोतोपरी मदत करीत आहे. कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होवू नये, यासाठी शेतकरी व शेतमजुरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

फवारणीमुळे विषबाधा झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेटी देऊन त्यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली आहे. या रुग्णांची प्रकृती स्थीर असल्याबाबत त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे. बाधित व्यक्तींच्या कुटुंबियांकडून कृषि अधिकाऱ्यांनी किटकनाशकांच्या वापराबद्दल माहिती घेतली आहे. विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांनी वापरलेल्या किटकनाशकांचे नमुने घेण्याबाबत संबंधित किटकनाशक निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या जिल्ह्यात सोयाबीन पिकांमध्ये तणनाशकांची फवारणी सुरु आहे. शिवाय नजीकच्या काळात किटकनाशकांची फवारणीही सुरु होतील. या फवारणी करतांना विषबाधा होवू नये, याकरीता कृषि विभागातर्फे मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसार मोहिम राबवून जनजागृती करण्यात येत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.

किटकनाशक फवारणी करताना शेतकरी व शेतमजुरांनी काळजी घेणे आवश्यक आहे. किटकनाशकांची फवारणी करतांना हवेच्या विरुद्ध दिशेने फवारणी करु नये. किटकनाशक वापरण्यापूर्वी किटकनाशकाच्या पॅकींगसोबतचे माहितीपत्रक वाचून त्यावर दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तणनाशक फवारणीचा पंप किटकनाशकाच्या फवारणीसाठी वापरु नये. फवारणी करतांना सुरक्षाकिटचा वापर करावा. शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम असलेल्या व्यक्तीने फवारणी करु नये. फवारणी करतांना तंबाखूगुटखा यासारख्या पदार्थांचे सेवन करु नये, तसेच धुम्रपान करु नये. फवारणी यंत्राचे नोझल तोंडात धरून फुंकू नये. किटकनाशकांचा शरीराशी सरळ संपर्क आल्यास पाण्याने स्वच्छ धुवावे. फवारणीचे द्रावण बनविण्याच्या ठिकाणी खाद्य पदार्थ किंवा पिण्याचे पाणी ठेवू नये. लहान मुलांना फवारणीपासून दूर ठेवावे.

किटकनाशकांचे रिकामे डब्बे फवारणी झाल्यानंतर नष्ट करावेत. फवारणीचे द्रावण हातांने न ढवळता लांब लाकडी काठीचा वापर करावा. उपाशीपोटी फवारणी करु नये. फवारणीचे काम आठ तासांपेक्षा जास्त वेळ करू नये. नियमीत फवारणी करणाऱ्या व्यक्तीने ठरावीक कालावधीनंतर डॉक्टराकडून स्वत:ला तपासून घ्यावे. फवारणी करतांना अशक्तपणा अथवा चक्कर आल्यासारखे वाटणेत्वचेची व डोळ्यांची जळजळ होणेडोकेदुखीअस्वस्थ होणेस्नायुदुखीधाप लागणे किंवा छातीत दुखणे अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास त्वरित फवारणी बंद करावी व डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.