बीटी विरहीत देशी संकरित कापूस लागवडीस इच्छुक शेतकऱ्यांना आवाहन

0
21

वाशिम, दि.10 : कृषि उन्नती कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान-व्यापारी पिके अंतर्गत बीटी विरहीत सधन कापूस विकास कार्यक्रम ही योजना सन २०१९-२० मध्ये जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या योजनेत सर्व तालुक्यातील शेतकरी भाग घेवू शकतात. या योजनेंतर्गत विविध प्रात्याक्षिके होणार असून त्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे. तरी बीटी विरहीत देशी संकरीत कापूस वाणाची लागवड करण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी १५ जुलै २०१९ रोजी दुपारी १२.३० वाजता संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत कापूस पिकाच्या बीटी विरहीत देशी वाणाची लागवड करावयची आहे. तसेच एकात्मिक कीड व्यवस्थापन आद्यरेषीय प्रात्याक्षिके, देशी कापसाची अतिघन लागवड प्रात्याक्षिके, आंतरपिक पद्धतीचे आद्यरेषीय प्रात्याक्षिके, पिक संरक्षण औषधी इत्यादी बाबी राबवायच्या आहेत. या योजनेसाठी नियमानुसार जिल्ह्यातील अनुसूचित जाती (किमान १६ टक्के) व अनुसूचित जमाती (किमान ८ टक्के) आणि सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या ३० टक्के महिलांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर कापसाची प्रात्याक्षिके आयोजित करण्यात येतील. त्यानंतर गटातील शेतकऱ्यांच्या आधार सलंग्न बँक खात्यात थेट अनुदान जमा करण्यात येईल. तरी या अटींची पूर्तता करणाऱ्या व बीटी विरहीत देशी संकरीत कापूस वाणाची लागवड करण्यास इच्छुक शेतकऱ्यांनी १५ जुलै २०१९ रोजी दुपारी १२.३० वाजता संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात उपस्थित राहावे, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

*****

डवरणी करताना सरी पाडल्यास पाण्याचा निचरा होण्यास मदत कृषि विभागामार्फत आवाहन

वाशिम, दि.10 : रुंद सरी वरंभा पद्धतीने पेरणी करण्याबाबत शेती शाळेतील लाभार्थी, गटशेती अंतर्गत शेतकरी, आत्मा गटातील शेतकरी व इतर सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले होते. बऱ्याच ठिकाणी बी.बी.एफ. पद्धतीने पेरणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना बी.बी.एफ. यंत्र उपलब्ध न झाल्यास सध्या पेरणी यंत्रास दोन्ही बाजूला फाळ लावून चर करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. मात्र तरीही काही शेतकऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने पेरणी केली असल्यास डवरणी करताना डवऱ्याला दोरी बांधून चार तासाआड सरी पाडून घ्यावी. त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी सरीत मुरते व जास्तीचे पाणी बाहेर निघून पिकाच्या मुळाजवळ हवा खेळती राहून पिकांची वाढ जोमाने होईल, असे वाशिम उपविभागीय कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.प्रत्येक कृषि सहाय्यक, शेतकरी गटांनी आपल्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारच्या सरी पाडण्याची मोहीम राबवावी व शंभर टक्के गावात हजर राहून सरी मोहीम यशस्वी करावी, असे आवाहनही वाशिम उपविभागीय कृषि अधिकारी यांनी केले आहे