कारंजा लाड येथे बालविवाह रोखला

0
17

वाशिम, दि. ११ : कारंजा लाड येथे बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर महिला व बालविकास विभाग आणि पोलीस विभागाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे हा बालविवाह रोखण्यात यश आले. कारंजा येथील युवकाचा विवाह मनभा (ता. कारंजा) येथील १६ वर्षीय युवतीशी ११ जुलै रोजी कारंजा येथील श्री कामक्षा देवी मंदिरात होणार होता. दोन्ही कुटुंबियांना हा विवाह गुपचूप उरकण्याची तयारी केली होती. मात्र या बालविवाहाची गोपनीय माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांना मिळाली. त्यांनी तात्काळ याबाबत इतर विभागाशी संपर्क करून जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या कर्मचाऱ्यांना व संरक्षण अधिकारी यांना वयाबाबत व इतर माहिती गोळा करण्याच्या सूचना दिल्या. मुलीच्या जन्माचा पुरावा घेऊन सदर कर्मचाऱ्यांनी १० जुलै रोजी कारंजा शहर पोलिसांच्या सहकार्याने मुलाच्या घरी भेट दिली. तसेच हा विवाह बालविवाह असून कायद्याने तो गुन्हा ठरतो, असे समजावून सांगतले. यावेळी अल्पवयीन मुलगी व तिचे कुटुंबही तिथेच असल्यामुळे दोन्ही कुटुंबाचे योग्य प्रकारे समुपदेशन करण्यात आले. सदरचा विवाह घडवून आणल्यास त्यांच्यावर बालविवाह अधिनियमाद्वारे योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे सांगितले. यावेळी दोन्ही कुटुंबाकडून मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय हा विवाह करणार नाही, असे हमीपत्र लिहून घेण्यात आले.

    मंदिरमस्जिदचर्चविहारगुरुद्वारामंगल कार्यालय इत्यादी ठिकाणी बालविवाह होत असल्यास तसेच असे बालविवाह लावणाऱ्या पुजारीभटजीकाजी,भन्ते अथवा इतर व्यक्तींवर सुद्धा गुन्हा दाखल केला जाईल. तसेच त्यांचेवर बालविवाह अधिनियमाद्वारे योग्य ती कार्यवाही केली जाईल. त्यामुळे विवाह लावताना प्रथम मुला-मुलींच्या वयाची खात्री करूनच पुढील बाबीस अनुमती द्यावी. विवाह जुलाविणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा मुला-मुलींच्या वयाबाबत खबरदारी घावी. अन्यथा कायद्याच्या गंभीर प्रकारास सामोरे जावे लागेल. तसेच जिल्ह्यामध्ये बालकांच्या अधिकाराचे हनन होईल, अशी कुठलीही अनुचित घटना घडत असल्यास तत्काळ १०९८ या चाईल्ड लाईनच्या टोल फ्री क्रमांकावर कळवावे व बालविवाहा सारख्या अनिष्ट प्रथेला प्रतिबंधित करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी केले आहे.