एका महिन्यात अभियानाचे उद्दिष्ठ पुर्ण करा – जिल्हाधिकारी शेखर सिंह

0
6

गडचिरोलीमध्ये पंडित दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ
गडचिरोली, दि.१६: पंडित दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान यशस्वी करावे, एका महिन्यात शिधापत्रिका व गॅस वाटपाचे उद्दिष्ठ पुर्ण करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज येथे केले. नियोजन भवन येथील सभागृहात पंडित दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद अध्यक्षा योगिताताई भांडेकर, आरमोरी विधानसभा सदस्य कृष्णाजी गजबे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, जे लाभार्थी ज्या निकषात पात्र ठरेल त्या प्रमाणे त्याला ती शिधापत्रिका वितरीत करण्यात येईल. या उद्दिष्टपूर्तीसाठी युद्धपातळीवर या अभियानांच्या यशस्वीतेसाठी आपण सर्वानी सक्रिय व्हावे. रास्त भाव दुकानदार यांनी ऑनलाईन पद्धतीनेचे धान्य वितरण होईल याची काळजी घ्यावी. या योजनेच्या अंमलबजावणबाबत साप्ताहीक आढावा अहवाल संबंधितांनी सादर करावयाचा आहे, जेणेकरुन गतिमानतेने योजनेची अंमलबजावणी पूर्ण होईल. सर्व संबंधित अधिकारी, विभाग तसेच रास्त भाव दुकानदार, गॅस कंपनीचे वितरक आणि ज्यांच्यासाठी हे अभियान राबवण्यात येत आहे त्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन या अभियानाला यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिताताई भांडेकर यांनी अभियानात सहभागी असलेल्या प्रशासनातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. धूरमुक्त व गॅस युक्त गडचिरोली जिल्हा करण्यासाठी आपल्या सर्वांचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे असे त्या म्हणाल्या. विधानसभा सदस्य कृष्णाची गजबे यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी आम्ही तालुका पातळीवर विविध कार्यक्रम घेणार असून या अभियानाला गती देणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
राज्यभरात पंडित दिनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान दि. १५ जूलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत राबवण्यात येणार असून या मध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे शंभर टक्के वाटप करणे, सर्व पात्र शिधापत्रिका धारकांना १०० टक्के धान्य वाटप करणे व सर्व पात्र कुटुंबाना १०० टक्के गॅस कनेक्शन देणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेच्या ९१८४९, प्राधान्य कुटंब योजनेच्या १०३३९० अशा शिधापत्रिका अस्तित्वात आहेत. जिल्हयात १५४०३९ एल पी जी गॅसधारक आहेत. या विशेष अभियानाच्या अनुषंगाने ज्या पात्र कुटुंबांकडे अद्यापही गॅस जोडणी नाही अशा ६५०९३ कुटुंबाना गॅस जोडणी देण्याची व पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका वाटपाची कार्यवाही करण्यात येणार आहे. याबाबत इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधावा.
यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पात्र कुटुंबांना प्रातिनिधीक स्वरुपात शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अभियानाबाबत माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश पाटिल यांनी दिली. कार्यक्रमास तहसिलदार, लाभार्थी, रास्त भाव दुकानदार, गॅस एजन्सीचे वितरण अधिकारी, प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.