खरीप पिक कर्ज वितरणाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

0
9

वाशिम, दि. २२ : जिल्ह्यातील खरीप पिक कर्ज वितरणाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक सोमवारी बँक प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार आज झालेल्या आढावा बैठकीत सर्व बँकांनी पिक कर्ज वितरण मेळाव्यांचे आयोजन करून अद्याप पिक कर्ज न घेतलेल्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पिक कर्जाचा लाभ देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी केल्या.यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक विजय खंडरे यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. मोडक यावेळी म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पिक कर्जाचा लाभ मिळवून देण्यासाठी बँकांनी गावापर्यंत जावून पिक कर्ज मेळावे घ्यावेत. या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या, पात्र अर्ज व वितरीत करण्यात आलेले कर्ज, अपात्र अर्ज, नवीन पात्र शेतकरी याविषयीचा अहवाल सादर करावा. प्रधानमंत्री पिक योजनेसाठी शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरण्याची मुदत २४ जुलै २०१९ पर्यंत असून या कालावधीत बँकेत प्राप्त होणारे सर्व प्रस्ताव बँकांनी स्वीकारण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

शेतकऱ्यांच्या गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी चालना योजनेंतर्गत अंतर्गत शेतकरी उत्पादक गटाला १ कोटी रुपयांपर्यंत प्रकल्प मंजूर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात अशा २० गटांना मान्यता मिळाली आहे. या शेतकरी गटांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी यावेळी केले.  बोरगाव येथील कृषीदीप शेतकरी उत्पादक कंपनीचे वसंता लांडकर व बाळखेड येथील बाळनाथ शेतकरी उत्पादक कंपनीचे विलास गायकवाड यांनी यावेळी आपल्या कंपनीमार्फत उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाची माहिती दिली.