योजनां जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची- डॉ.चव्हाण

0
15

प्रसारमाध्यम प्रतिनिधी कार्यशाळा
गोंदिया-: सामाजिक न्याय विभाग तसेच अन्य विभागाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत. लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळून त्या योजनांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची आहे. असे प्रतिपादन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एस.एम.चव्हाण यांनी केले.
आज (ता.१०) सामाजिक न्याय भवनात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्ताने आयोजित सामाजिक समता सप्ताहात प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उदघाटक म्हणून डॉ.चव्हाण बोलत होते.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्‍हा माहिती अधिकारी विवेक खडसे हे होते, प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते, जि.प.चे कृषी अधिकारी व्ही.आर.निमजे यांची उपस्थिती होती.
डॉ.चव्हाण पुढे म्हणाले, सामाजिक समता सप्ताहात सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणारे विभाग तसेच या विभागाअंतर्गत असलेल्या महामंडळाच्या योजनांना प्रसारमाध्यमांनी व्यापक प्रसिद्धी दयावी. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यास मदत होईल असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये दुधाळ जनावराचे गट वाटप, शेळी गट वाटप, मोफत खाद्य वाटप, प्रशिक्षण योजना, नाविन्यपूर्ण योजना आदी योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना श्री.खडसे म्हणाले, सामाजिक न्याय विभाग तसेच या विभागाअंतर्गत असलेल्या महामंडळाच्या विविध योजनांची माहिती प्रसारमाध्यमांना व्हावी हा या कार्यशाळेमागचा उद्देश असून प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून ती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी. विविध जाती धर्मातील नागरीकांनी गुण्या-गोविंदाने राहावे व सामाजिक समता वृद्धींगत करावी हा या सप्ताहाचा उद्देश आहे. नागरिकांनी आपल्या मुलभूत हक्काबाबत नेहमी जागृत असले पाहिजे. शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रसारमाध्यम करीत असतात असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पोलीस उपविभागीय अधिकारी श्री.नखाते म्हणाले, १९८९ चा नागरी हक्क संरक्षण कायदा आहे. या कायदयाची जनतेमध्ये जनजागृती निर्माण करणे आवश्यक आहे. गृह विभागामार्फत मनोधैर्य योजना राबविण्यात येते. या योजनेमार्फत पिडीत महिलांना आर्थिक मदत उपलब्ध करुन देण्याचे काम पोलीस विभाग करीत असतो. शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकास करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग प्रयत्नशील आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कृषी अधिकारी श्री.निमजे यांनी, सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक योजनेअंतर्गत जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या मदत करुन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम करणे. तसेच कृषी चर्चासत्र व कृषी प्रदर्शनीद्वारे जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे काम या योजनेअंतर्गत करण्यात येते असे सांगितले.
इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जयदेव झोडापे यांनी त्यांच्या महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, सुक्ष्म पतपुरवठा योजना, महिला समृद्धी योजना, स्वर्णिमा योजना, मुदती कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज योजना, मार्जिन मनी योजना तसेच अपंग वित्त विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
संत रविदास चर्मोद्योग विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक श्रीमती भगत यांनी, ५० टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना, प्रशिक्षण योजना, गटई स्टॉल योजना, महिला किसान योजना, महिला समृद्धी योजना, शैक्षणिक कर्ज योजना आदी योजनांची माहिती दिली.
वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे श्री.माने यांनी बीज भांडवल कर्ज योजना, थेट कर्ज योजना, अनुदान योजना, मुदती कर्ज योजना, मार्जिन मनी कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज योजना, सक्षम योजना, शिल्प संपदा योजना, स्वर्णिमा योजना, मायक्रो क्रेडीट योजना, महिला समृद्धी कर्ज योजना, कृषी संपदा, प्रशिक्षण योजना आदी योजनांबाबत माहिती दिली.
प्रास्ताविकातून समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुनील जाधव म्हणाले, सामाजिक न्याय विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. विशेषकरुन शिष्यवृत्ती योजना, घरकूल योजना, कन्यादान योजना, आंतरजातीय विवाह योजना, मागेल त्याला प्रशिक्षण आदी योजनांची माहिती प्रसारमाध्यमांनी व्यापक प्रमाणात प्रचार-प्रसिद्धी करुन तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत
या योजनांची माहिती पोहोचवावी असेही ते म्हणाले.
प्रारंभी मान्यवरांनी दीप प्रज्वलन करुन महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. संचालन बी.आर.चव्हाण यांनी केले, तर उपस्थितांचे आभार निलेश वाडेकर यांनी मानले. कार्यशाळेला प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, समाजकल्याण विभागाचे, महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मण खेडकर, अरुण पराते, राजेश खरोले, माणिक इरले, शैलेश उजवणे व योगेश हजारे यांनी परिश्रम घेतले.