राष्ट्रीय बालक हक्क संरक्षण आयोगाच्या शिबिरामुळे बालकांवरील अन्यायाविरुद्ध दाद मागण्याची संधी-जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

0
19
????????????????????????????????????
  • तक्रार निवारण शिबिराबाबत पत्रकार परिषद
  • प्रत्येक बालकाला अन्यायाविरुध्द दाद मागण्याचा हक्क
  • समाजातील सर्व घटकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी सहकार्य करा

वाशिम, दि. २३ : बालकांवरील अत्याचार, पिळवणूक याविषयीच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत वाशिम येथे १ ऑगस्ट २०१९ रोजी एकदिवशीय विभागस्तरीय तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामुळे वाशिमसह अमरावती विभागातील इतर जिल्ह्यातील बालकांना आपल्यावरील अन्यायाविरुद्ध दाद मागण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या शिबिराची माहिती समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसारमाध्यमांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केले.वाकाटक सभागृहात आयोजित या पत्रकार परिषदेला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा तक्रार निवारण शिबिराचे संपर्क अधिकारी सुभाष राठोड यांच्यासह विविध वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांचे हक्क जोपासण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने बाल न्याय अधिनियम, बालकांच्या संबधित कायदा (पोस्को कायदा), बालविवाह कायदा यासारखे विविध कायदे केलेले आहेत. या कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद आहे. या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होते किंवा नाही, हे पाहण्याचे काम राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग करतो. तसेच या कायद्यांचे उल्लंघन झाले असल्यास, बालकांशी निगडीत शारीरिक दंड, गैरवर्तन, बालकांशी लैंगिक गैरवर्तन, बालकांची विविध माध्यमांतून होणारी खरेदी व विक्री, शिक्षण, आरोग्याबाबत अन्याय, हिसाचार, भेदभाव यासारख्या अन्याय, अत्याचाराविरुद्धच्या तक्रारींची दखल आयोगामार्फत घेण्यात येते. समाजातील सर्व घटकातील बालकांना आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुध्द आयोगासमोर तक्रार दाखल करता येईल. तसेच बालकांच्यावतीने इतर कोणीही व्यक्ती तक्रार दाखल करू शकतात.

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील अन्याय, अत्याचारग्रस्त बालकांनी आपल्या तक्रारी १ ऑगस्ट २०१९ रोजी वाशिम येथे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे होणाऱ्या तक्रार निवारण शिबिरात दाखल कराव्यात. सकाळी ९ वाजेपासून या तक्रारींची नोंदणी सुरु होणार असून सकाळी १० वाजेपासून आयोगाची सुनावणी सुरु होईल, असे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी सांगितले. तक्रार निवारण शिबिराची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती त्यांनी यावेळी दिली.