१ ऑगस्ट रोजी वाशिम येथे विभागस्तरीय तक्रार निवारण शिबीर

0
11
  • बालकांच्या अधिकारांच्या उल्लंघनाबाबत तक्रारींवर सुनावणी

वाशिम, दि. २9 : बालकांवर होणारे अत्याचार, पिळवणूक, त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन आदी विषयीच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत गुरुवार, १ ऑगस्ट २०१९ रोजी वाशिम येथे विभागस्तरीय एकदिवसीय तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित या शिबिरात सकाळी ९ वाजेपासून तक्रारींची नोंदणी सुरु होईल. तसेच सकाळी १० वाजेपासून सुनावणीला सुरुवात होणार आहे. यामध्ये अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील बालकांना आपल्यावरील अन्यायाविरुद्ध दाद मागता येणार आहे.

राष्ट्रीय बाल हक्क आयोगामार्फत देशात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करून बालकांच्या तक्रारी नोंदविल्या जातात. नीती आयोगाने निवडलेल्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश असल्याने राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने वाशिम येथे तक्रार निवारण शिबीर आयोजित केले आहे. रस्त्यावर राहणारी बालके, शाळकरी बालके, बालकांची काळजी घेणारी संस्था, बालगृह, वसतिगृह किंवा इतर ठिकाणी शिक्षण, प्रशिक्षण घेत असलेली किंवा निवासी राहत असलेली प्रत्येक घटकातील बालके आयोगासमोर स्वतः तक्रार दाखल करू शकतात किंवा बालकांच्यावतीने इतर कोणतीही व्यक्ती तक्रार दाखल करू शकते.

बाल कामगार निर्मुलन किंवा त्रासात असलेल्या बालकांबाबतच्या तक्रारी, बाल न्याय किंवा दुर्लक्षित, अपंग, बालकांच्या काळजीबाबतच्या तक्रारी, अॅसिड हल्ला, भिक्षावृत्ती, बालकांचे शोषण, बालकांची काळजी घेणाऱ्या संस्था, बालकांची खरेदी-विक्री, अपहरण, शिक्षण याविषयीच्या तक्रारी, बाल न्याय अधिनियम, बालकांच्या संबधित कायदा (पोस्को कायदा), बालविवाह कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा आदी कायद्यांचे उल्लंघन यासह बालकांवर होणारा अन्याय व अत्याचार विषयक तक्रारी, बालकाचे आरोग्य, काळजी, कल्याण आणि विकास याविषयीच्या तक्रारी या शिबिरामध्ये दाखल करता येणार आहेत. तक्रार निवारण शिबिराविषयी अधिक माहितीसाठी संपर्क अधिकारी म्हणून वाशिमचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड (भ्रमणध्वनी क्र. ९४०३०२४७८६) यांची नेमणूक करण्यात आली आहे. तक्रार निवारण शिबिरात तक्रार दाखल करण्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बालकांनी अथवा त्यांच्या पालकांनी संबंधित जिल्ह्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे संपर्क करावा, असे आवाहन वाशिम जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.