महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी २८ महिला बचत भवन बांधणार – आ.गोपालदास अग्रवाल

0
11

प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला मेळावा
गोंदिया,दि.02 : गोंदिया तालुक्यात महिला आर्थिक विकास महामंडळाने बचतगटाची मोठी चळवळ सुरु केली आहे. ग्रामीण आणि शहरी भागात ८३३ बचतगटांच्या माध्यमातून ९७७२ महिला संघटीत होवून उद्योग व्यवसाय सुरु करुन स्वावलंबनाकडे वळत आहे. आता महिलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी त्यांच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी गोंदिया तालुक्यात २८ गावात महिला बचतगट भवन बांधणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
१ ऑगस्ट रोजी जलाराम लॉन येथे जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समिती, नियोजन विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त वतीने आणि उत्कर्ष लोकसंचालीत साधन केंद्र गोंदिया यांच्या सहकार्याने आयोजित प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळाव्याचे उद्घाटक म्हणून आमदार अग्रवाल बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.महिला व बाल कल्याण समिती सभापती लता दोनोडे, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, न.प.सदस्य भावना कदम, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक निरज जागरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समितीचे सदस्य धनंजय वैद्य, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, उत्कर्ष लोकसंचालीत साधन केंद्राच्या अध्यक्ष तुलसी चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.अग्रवाल पुढे म्हणाले, एकीकडे मोठे उद्योगपती बँकांचे कर्ज बुडवून पळून जातात. मात्र बचतगटातील महिला ह्या घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळीच करतात. महिला ही घरची अर्थ आणि गृहमंत्री आहे. घराचे बजेट कसे करायचे हे काम महिला चांगल्याप्रकारे करतात. महिलांच्या बचतगटाच्या चळवळीला सर्वांकडून मदत मिळाली पाहिजे. बँकांनी बचतगटांना कर्ज देतांना कमी व्याज दर आकारण्याचा विचार केला पाहिजे. बचतगटांना व्याजदरात सवलत मिळाली तर ही चळवळ आणखी सक्षम होईल. सहकारी बँकांनी सुध्दा बचतगटांना कर्ज देतांना कमी व्याजदर आकारले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
महिलांचा विकास झाला पाहिजे, त्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगून श्री.अग्रवाल पुढे म्हणाले, प्रत्येक ग्रामसंघाला बचत भवन असले पाहिजे ही आपली इच्छा आहे. तालुक्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी २८ बचत भवन बांधण्यात येणार असून त्यासाठी २ कोटीचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याच महिन्यात या बचत भवनांचे भूमीपूजन करण्यात येईल. जिल्ह्यातील बचतगटांच्या उत्पादित वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील बचतगटांच्या अर्थाजनास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती मडावी म्हणाल्या, बचतगटांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाला मदत मिळाली आहे. शेती व्यवसायासाठी देखील बचतगटातील महिला घरच्या कर्त्या पुरुषाला मदत करीत आहे. शेळी पालन, मत्स्य पालन यासह अनेक योजना आहेत. बचतगटातील महिलांनी कोणत्या योजनांचा लाभ घ्यावा हे त्यांनीच ठरवावे असे त्यांनी सांगितले.
श्रीमती दोनोडे म्हणाल्या, आज पुरुषांपेक्षा महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. त्यांनी जिद्दीने कोणत्याही क्षेत्रात काम करावे. पूर्वी महिला चुल आणि मुल या कार्यक्षेत्रापुरत्याच मर्यादित होत्या, आज त्या सर्वच क्षेत्रात काम करीत आहे. महिलांनी स्वत:च्या आरोग्यासह कुटूंबाच्या आरोग्याकडे देखील लक्ष दयावे. छोटे-छोट उद्योग सुरु करुन कुटूंबाला हातभार लावावा.
श्रीमती हरिणखेडे म्हणाल्या, आज महिला विविध उद्योग उभारुन स्वावलंबी होत आहे. महिला ह्या घेतलेल्या कर्जाची परतफेड नियमीत करतात. महिलांनी कुटूंबाकडे लक्ष देवून महिलांना चांगले शिक्षण दयावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
भावना कदम म्हणाल्या, प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या निमित्ताने महिला आज या मेळाव्याला एकत्र आल्या आहेत. माविमच्या माध्यमातून महिला आता सक्षम होत आहे. प्रत्येक्ष क्षेत्रात महिलांनी पुढे आले पाहिजे. महिलांनी एकमेकींना पुढे नेण्यास हातभार लावला पाहिजे असे त्या म्हणाल्या.
डॉ.बेदरकर म्हणाल्या, बचतगटातील महिलांनी बचतगटाअंतर्गत मिळणाऱ्या कर्जातून उद्योग व्यवसाय सुरु करुन प्रगती साधावी. कुटूंबाच्या प्रगतीत महिलांचे योगदान महत्वपूर्ण असून त्यासाठी महिलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे सांगितले.
यावेळी श्री.जागरे, श्री.खडसे यांनी समायोचित मार्गदर्शन केले. सन २०१८-१९ या वर्षात मुद्रा योजनेतून कर्ज घेवून उद्योग सुरु करणाऱ्या दिपाली खवासे व पुष्पा विखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी उत्कृष्ट ग्रामसंस्था म्हणून सहयोग ग्रामसंस्था बाघोली, उत्कृष्ट वस्तीस्तर संघ म्हणून गोंदिया येथील शिल्पकार वस्तीस्तर संघ, सात लाख रुपये घेवून व्यवसाय सुरु करणारा गणखैरा येथील ओमश्री स्वयंसहाय्यता बचतगट, गोंदिया रामनगर येथील रजा महिला बचतगट, यशस्वी महिला उद्योजक म्हणून सेजगाव येथील ममता बारेकर, बचतगटांच्या महिलांचे पाल्य यांनी दहावी व बारावी परीक्षेमध्ये चांगले यश संपादन केल्याबद्दल एकोडी येथील देवकी ठाकरे, गोंदिया येथील संस्कृती काळे यांचा गौरवचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुद्रा योजनेअंतर्गत १५ महिलांना १२ लाख रुपये कर्ज मंजूरीचे पत्र देण्यात आले. यामध्ये भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा गोंदिया- ६ लाभार्थी, बँक ऑफ इंडिया शाखा एकोडी- २ लाभार्थी, विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा गोंदिया- २ लाभार्थी, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गोंदिया- ४ लाभार्थी आणि इंडियन ओव्हरसीस बँक शाखा गोंदिया- १ लाभार्थी, अशा एकूण १५ लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यासोबतच गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ११ महिला बचतगटांना २२ लक्ष ५० हजार रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हा अग्रणी बँकेच्या प्रतिनिधी हिना अग्रवाल, बँक ऑफ इंडिया शाखा एकोडीच्या श्रीमती बन्सोड, आयसीआयसीचे व्यवस्थापक अर्जुन रहांगडाले, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक मलिंक्य बेसरा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज विभागप्रमुख दुर्गेश रहांगडाले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. बचतगटातील महिलांनी वस्तू विक्री व खाद्य पदार्थाचे स्टॉल लावले होते. जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या कार्यालयाच्या वतीने हिवताप निर्मूलनासाठी कशाप्रकारे आपण उपाययोजना करावी याची सचित्र माहिती उपस्थित महिलांना दाखवून आशिष बले व पंकज गजभिये यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी मानले. संचालन प्रदिप कुकडकर व मोनिता चौधरी यांनी केले. या मेळाव्याला गोंदिया तालुक्यातील व गोंदिया शहरातील बचतगटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, उत्कर्ष लोकसंचालीत साधन केंद्राच्या व्यवस्थापक मोनिता चौधरी, कुंजलता भुरकंडे, आशिष बारापात्रे, श्री.सोनवणे, श्री.मेश्राम, श्री.अवघड यांच्यासह माविमच्या सहयोगिनी यांनी सहकार्य केले.