अण्णाभाऊ साठेंनी प्रस्थापित व्यवस्थेवर पहिला दगड मारून समाजाची दिशा व दशा बदलून टाकली -प्रा.चव्हाण

0
20

गोंदिया,दि.02ः-अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवस शाळेत जाऊन शाळेतील अमानुष वागणूक बघून शिक्षकाच्या  अंगावर दगड भिरकावून शाळेला रामराम ठोकला आणि मातंग समाजाची दशा आणि दिशा बदलून टाकली असे समयोचित उद्गार प्राध्यापक धर्मशील चव्हाण यांनी काढले.ते येथील मातंग समाजाच्या वस्तीत अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात बोलत होते.याप्रसंगी मंचावर सविता अग्रवाल, विजय पात्रे ,डॉ.सविता बेदरकर ,विश्वदीप बागडे उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, अण्णा भाऊंना पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक कामे करावी लागली. 16 ऑगस्ट 1947 रोजी” ये आझादी झुठी है देश कि जनता भुखी है” असे म्हणत विशाल मोर्चा काढला. जगातल्या सत्तावीस भाषात त्यांच्या कथा -कादंबऱ्यांचे रूपांतर झालेले आहे. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून ती श्रमिकांच्या आणि कामगारांच्या तळहातावर तरली आहे असे म्हणणारे अन्नाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे म्हणजे साम्यवादी विचारांचा धगधगता निखारा होता.त्यांनी स्वाभिमान गहाण राखला नाही. गरिबीत जगले पण कोणासमोर लाचारी पत्करली नाही. त्यांचा आदर्श घेऊन आज तुम्हाला वाटचाल करायची आहे असेही ते म्हणाले. याप्रसंगी सविता अग्रवाल आणि सविता बेदरकर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून तेथील मुलांना नानन बिसेन यांनी शालेय गणवेश यांचे वाटप केले. प्राध्यापक धर्मशील चव्हाण यांनी वह्या पुस्तका ,पेन्सिल, कंपास बॉक्स आणि शालेय उपयोगी वस्तूंचे वितरण केले.मांग गारूडी समाजाच्या वस्तीत जयंतीच्या निमित्ताने व्यसनापासून दूर राहू, अंधश्रद्धेचा धिक्कार करू, उपाशी राहू पण पोराला शिकवू असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय पात्रे यांनी तर आभार वंदना पात्रे यांनी मानले. यावेळेस मातंग मांग गारूडी समाजाचे असंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पहांदी पारी कुपार लिंगो या बहुउद्देशीय संस्थेने सहकार्य केले या संस्थेमार्फतच मुलांना फराळाचे आणि इतर साहित्य वाटप करण्यात आले.